>>>अतुल नागदेवे | विशेष प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच भंडारा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षात तिकीट मिळवण्यासाठी चुरस वाढत असून, जुने-नवे चेहरे एकाच रिंगणात उतरले आहेत. तिकीट न मिळालेल्या इच्छुकांचा रुसवा आणि त्यांच्या पुढील पावलांमुळे पक्षनेत्यांना चांगलीच डोकेदुखी सहन करावी लागणार आहे.
यंदा भंडारा नगरपरिषदेच्या १७ प्रभागांसाठी निवडणूक होणार असून, ३५ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष जनतेतून निवडले जाणार आहेत. आरक्षणानुसार नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठरले आहे. यामुळे अनेक इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासूनच आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काहींनी सणासुदीच्या काळात होर्डिंग्ज, सामाजिक उपक्रम आणि जनसंपर्कातून आपली दावेदारी ठासून सांगितली आहे. विशेष म्हणजे, यंदा अनुभवी राजकारण्यांबरोबरच नव्या चेहऱ्यांनीही निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.
पक्षांतर्गत तिकीट वाटपाची प्रक्रिया मात्र पेचात सापडली आहे. एका जागेसाठी दोन-तीन इच्छुक पुढे येत असल्याने पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. तिकीट न मिळाल्यास नाराज उमेदवार अपक्ष उभे राहतील किंवा अन्य पक्षांशी हातमिळवणी करतील, अशी भीती आहे. अशा परिस्थितीत पक्षाची एकजूट टिकवणे आणि निवडणुकीचे गणित बिघडू न देणे, हे पक्षनेत्यांसमोरील मोठे आव्हान आहे. निवडणुकीत जनतेचा कौल महत्त्वाचा असला, तरी पक्षांतर्गत समतोल राखणेही तितकेच गरजेचे आहे. नव्या आणि जुन्या चेहऱ्यांमधील योग्य समन्वयच यशाचा किल्ली ठरेल,” असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. आता पक्ष कोणाला संधी देतो आणि नाराजांना कसे सांभाळतो, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

