भंडारा : तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे वैनगंगा नदीकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर अवैध जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर तुमसर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध तुमसर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ४५ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. उमरवाडा येथील सिमेंट रस्त्यावर काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक गंगवानी आणि पोलीस शिपाई बिसने यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. या कारवाईत मनोज धर्मेंद्र श्यामलाल बनकर (वय २३), लक्ष्मीकांत श्रीराम बोरकर (वय २८), विशाल भाऊराव राऊत (वय २५), योगेश रामा शहारे (वय २७) आणि राज सुनिल झेलकर (वय १९), सर्व रा. उमरवाडा, ता. तुमसर यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात अवैध जुगाराच्या गतिविधींना चाप बसण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलिस करीत आहेत.
अवैध जुगार अड्ड्यावर छापा; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

