>>>भंडारा चौफेर | प्रतिनिधी लाखनी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आली आहे. संशयास्पद नोंदीमुळे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते तात्पुरते थांबविण्यात आले आहेत, त्यांनी माहिती तात्काळ अद्ययावत करून ‘ई-केवायसी’ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
दि. २४ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,०००/- ची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत २० हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, शेवटचा हप्ता (२०वा) २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित झाला. तो केंद्र शासनाने संशयित प्रकरणांतील शेतकऱ्यांसाठी तात्पुरता स्थगित केला आहे.
‘या’ कारणांमुळे थांबला आहे तुमचा हप्ता
जमिनीची खरेदी/भेट/वाटप झाले असल्यास. सध्याचे आणि मागील जमीन मालकाचा अहवाल संशयास्पद वाटल्यास. मागील मालकाचा अहवाल अपूर्ण असल्यास. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते वरील कारणांमुळे थांबले आहेत, त्यांनी लवकरात लवकर नजीकच्या सेंटर (सामान्य सेवा केंद्र) मध्ये जावे आणि पी.एम. किसान पोर्टलवरील फार्मर कॉर्नर मधील “अपडेट्स मिससिंग इन्फॉर्मशन” या टॅबमधून आपली अपूर्ण किंवा चुकीची माहिती अद्ययावत करावी.
माहिती अद्ययावत केल्यानंतर बायोमेट्रिक किंवा फेस ऑथॉ्हेंटिकेशन द्वारे ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.लाभार्थी स्वतः पी.एम. किसान खात्यातील चुकीची अथवा अपूर्ण असलेली माहिती या सुविधेमधून अद्ययावत करू शकतात. ही माहिती अद्ययावत झाल्यावर तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी उपलब्ध होईल. मंजुरी मिळाल्यावर सदर प्रकरणे पुन्हा सक्रिय होऊन संबंधित शेतकऱ्यांचे लाभ सुरू होतील.
शेतकऱ्यांनी आपली नावे या तीन प्रकारच्या यादीत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत येथे संपर्क साधावा. तसेच, शेतकरी स्वतः पी.एम. किसान पोर्टलवर स्टेटस चेक करून आपल्या लाभाचे कारण तपासू शकतात ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसदारांनी व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र ६ महिन्यांच्या आत कृषी कार्यालयास सादर करून मयत लाभार्थ्याचे हप्ते बंद करावेत. त्यानंतरच वारसदारांना सदर योजनेत नोंदणी करता येणार आहे.

