भंडारा : साकोली तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत वलमाझरीने पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गावातील नागरिकांनी २०२५-२६ चे सर्व घर कर, पाणी पट्टी कर आणि त्यापूर्वीचे थकीत कर १५ मे २०२५ पर्यंत भरल्यास लकी ड्रॉद्वारे विमानवारीसह विविध आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. हा ठराव ग्रामपंचायतच्या २३ एप्रिल रोजी झालेल्या मासिक सभेत एकमताने घेण्यात आला.
खैरी, वलमाझरी, पिटेझरी आणि आमगाव या चार गावांच्या गट ग्रामपंचायतीने यापूर्वीच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार आणि केंद्र शासनाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार पटकावला आहे. सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने वर्षभर विविध उपक्रम राबवले, ज्यामुळे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छ, निरोगी, सुंदर आणि हरित क्रांती गावासाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, सचिव आणि गावकरी यांचेही मोलाचे सहकार्य आहे.
★लकी ड्रॉची आकर्षक बक्षिसे
या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्या कुटुंबातील एका व्यक्तीला नागपूर ते हैदराबाद विमान प्रवास, व राहण्याची व्यवस्था आणि परतीचा रेल्वेने वातानुकूलित प्रवास अशी संधी मिळनार आहे.तर, दुसऱ्या क्रमांकाला १०० किलो जय श्रीराम तांदूळ, तिसऱ्या क्रमांकाला कुटुंबातील पाच जणांसाठी अभयारण्य सफारी, चौथ्या क्रमांकाला २० किलो तुरीची डाळ, पाचव्या क्रमांकाला एक टिन खाद्यतेल आणि सहाव्या क्रमांकाला चांदीचा शिक्का अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, सर्व कर भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला मोफत कणिक दळून दिली जाणार असून, मोफत आरोचे शुद्ध पाणीही पुरवले जाणार आहे.
★गावाचा सर्वांगीण विकास
वलमाझरी ग्रामपंचायत केवळ बक्षिसांपुरतीच मर्यादित नाही. गावात कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते, तर कार्बन न्यूट्रल गावासाठी प्रत्येक घर आणि परिसरात वृक्षारोपण केले आहे. या उपक्रमांमुळे गावकऱ्यांमध्ये कर भरण्यासाठी उत्साह आणि स्पर्धेची भावना निर्माण झाली आहे. हा उपक्रम गावाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरत असल्याने सर्वत्र ग्रामपंचायतच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांनी सांगितले, “आमचे गाव स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध व्हावे, यासाठी आम्ही नवनवीन उपक्रम राबवत आहोत. गावकऱ्यांचा सहभाग आणि सहकार्य यामुळे हे शक्य झाले आहे.