>>>>>भंडारा चौफेर | लाखनी प्रतिनिधी
राज्य विधानसभा निवडणुकीचे बिगुल नुकतेच वाजले आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. गावखेड्यात आमदारकीची तिकीट कुण्या पक्षाची व कुणाला मिळेल, यावरून चर्चा सुरू झाली आहे. सणासुदीचे दिवस त्यात निवडणुकीची हवा गरम व्हायला लागली आहे. गावकट्टे, गर्दीची ठिकाणे, सलून, बसस्थानकावर या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. भाऊ, लाइनीत लय हाय, विधानसभेची तिकीट कुणाला भेटन गा? हेच वाक्य ज्याच्या त्याच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
लाखनी तालुक्यात हेच चित्र आहे. सर्वपक्षीय उमेदवार नागपूर तसेच नुकत्याच झालेल्या नवरात्र उत्सवात आपल्या नेत्यांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. तालुक्यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटांत निवडणूक लढण्यासाठी उमेदवार बाशिंग बांधून तयार आहे. परंतु अद्यापही तिकीट जाहीर न झाल्यामुळे ‘एक अनार सब बिमार’, अशी अवस्था राजकीय नेत्यांची झाली आहे.
विद्यमान पक्षाच्या आमदारांकडून आपल्या कामांचा लेखाजोखा सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षातर्फे महागाई, बेरोजगारी हे मुद्दे उचलल्या जाण्याची जास्त शक्यता आहे. सध्या तरी तिकीट कुणाला मिळेल, याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे.
ग्रामीण भागात पानठेल्यावर व सार्वजनिक ठिकाणी तसेच सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे भाऊ तिकीट कुणाले मिळेल, सध्या उमेदवाराची घोषणा व्हायची आहे. त्यानंतरच निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी तालुक्यात सुरू होईल. परंतु सध्या तरी कुणाला उमेदवारी मिळेल, यावरून चर्चेचे फड रंगत आहे हे मात्र निश्चित आहे.