>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून साकोली विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू करण्यात आली असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर आता उमेदवार निवडण्यासाठी भाजपचे निरीक्षक माजी आमदार सुधाकर कोहळे हे साकोली मतदारसंघात जाऊन पदाधिकारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी यांचे गोपनीयरित्या मतदान घेणार आहेत. हे मतदान आज, मंगळवारी होणार असून प्रत्येक मतदानासाठी निश्चित केलेल्या पदाधिकाऱ्यास स्वतःचे नाव न देता १ ते ३ अशा पसंतीक्रमाने तीन उमेदवारांची नावे लेखी द्यायची आहेत.
हेही वाचा : हवा…एका मतदारसंघात तीन तालुके असल्याने चढाओढ वाढली
साकोली मतदारसंघासाठी हे मतदान भारत सभागृहात घेतले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाने निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला असल्याची माहिती आहे.
त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि मतदारसंघातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांचा कल जाणून घेण्यासाठी हे मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे इच्छूकांकडून पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी करीत जोरदार लॉबिंग सुरू आहे.
उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याचा हा प्रयोग भाजप करणार आहे. तो अंमलात कसा आणायचा यासाठी गेल्या चार दिवसांत संपूर्ण राज्यासाठी एक आणि प्रत्येक विभागासाठी एक अशा बैठका केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे भाजप विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव यांनी घेतल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. बंद लिफाफ्यातून कुणाला उमेदवारीची लॉटरी लागणार याकडे आता लक्ष असेल.
भाजपाचे उमेदवार कोण?
साकोली मतदारसंघात माजी आमदार बाळा (राजेश) काशीवार यांच्यासह वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा कार्यकर्ते सोमदत्त करंजेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड वसंत एंचिलवार, पवणीचे डॉ. विजया ठाकरे नंदूरकर अशी नावे चर्चेत आहेत. एकाधिकाशाहीला विरोध करून भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आयात वा संघटनेने लादलेला उमेदवार नको म्हणून हालचाली सुरु केल्या आहेत.
हेही वाचा : दीपोत्सवानंतर लोकोत्सव ! मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे संकेत
आयात वा संघटनेने लादलेला उमेदवार पक्षाने दिल्यास भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाला थेट रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पक्षातील नेतेमंडळींनीच नाव न जाहिर करण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे साकोली विधानसभेत भाजपा कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेला लोकाभिमुख तगडा चेहरा देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
घडामोडींवर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून लक्ष
भाजपात वेगळ्या शैलीची कार्यपद्धती राबविण्यात असल्याचे सर्वश्रुत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त देखील एक यंत्रणा काम करत असते. या यंत्रणेतील सदस्य थेट राज्य आणि केंद्र पातळीशी संलग्न असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात.
हेही वाचा : “लाडक्या बहिणीला” प्रतिनिधित्व मिळणार काय?
सध्या साकोली मतदारसंघात भाजपाच्या बाहेरच्या नेत्याच्या एकाधिकारशाहीमुळे भाजपामधील अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी, जि. प. सदस्य, कार्यकर्ते असंतुष्ट आहेत. एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला असलेला साकोली विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कलहामुळे हातातून निसटू नये, याकरिता वरिष्ठ पातळीवरुन हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
संघ देखील दक्ष
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील हिंदुत्वाच्या मुद्दयावर दक्ष झाला आहे. भाजपच्या निवडणूक मोहिमेत संघाची भूमिका कायमच महत्त्वाची राहिली आहे. संघाने बैठकांचे सत्र सुरू केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप संघाची मदत घेणार हे निश्चित. यामुळे संघ कुणाला पसंती देईल? याकडेही लक्ष आहे
अशी असेल प्रक्रिया
या मतदानात पक्षाचे पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक यांच्याकडून त्यांना कोणाला उमेदवारी द्यावी, असे वाटते याबाबत तीन पसंती क्रमांकानुसार नावे घेणार आहे, ही सर्व प्रक्रिया गोपनीय असणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतदानाचा हा अहवाल पक्षाला सादर केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे उमेदवार निश्चित करताना मतदारसंघातील पदाधिकार्यांचा कल काय हे जाणून घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.
यांची मते लिफाफ्यात घेणार
प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्यांसह निमंत्रित व विशेष निमंत्रित, प्रदेश मोर्चाचे पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, जिल्ह्याच्या विविध मोर्चाचे अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस, मंडळांच्या सेलचे संयोजक, जि.प., पं.स. नगरपरिषद सदस्य, आजी-माजी आमदार-खासदार, कृउबाचे संचालक, तालुका सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यांना मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार कोण असावेत? यासाठीच लिफाफे महत्त्वाचे ठरणार आहेत.

