>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर ७.८३ टक्के मतांची वाढ होतेच कशी? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे व याप्रकरणी निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. दरम्यान, पटोले यांनी केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोगानेही स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा : राज्यात मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के, तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले. यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला?असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
हेही वाचा : मतपत्रिकेवर निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची स्वाक्षरी मोहीम
पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री के.सी. पाडवी, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले यांनी मतांची आकडेवारी देत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता, मतदार केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती बूथवर अशा रांगा लागल्या होत्या, ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावले होते, त्याचे चित्रीकरण दाखवावे.
हेही वाचा : लाडकी बहीण योजना सुरु ठेवण्याचे ‘महायुती’ पुढे मोठे आव्हान!
मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते, यावेळी आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही? वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, असे सवालही पटोले यांनी उपस्थित केले.
काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नव्हे तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
निवडणूक आयोगाचेही प्रत्युत्तर
यंदा २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजता मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के (अंदाजे) होती आणि अंतिम मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. हे सामान्य आहे, कारण संध्याकाळी ६ नंतर रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीने मतदान करेपर्यंत मतदान चालूच असते. २०१९ मध्येही टक्केवारी संध्याकाळी ५ वाजता ५४.४३ टक्के (अंदाजे) आणि अंतिम वेळी ६१.१० टक्के होती. महाराष्ट्रातील शहरी आणि निमशहरी भागात मोठ्या संख्येने मतदार संध्याकाळी येतात, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.