>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, शहरात आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, उमेदवारी अर्ज (नामांकन पत्र) दाखल करण्याची प्रक्रिया आज, १० नोव्हेंबर पासून सुरू होत असून, १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपली कागदपत्रे सादर करता येणार आहेत. निवडणूक आयोगाने प्रचारासाठीची मर्यादाही स्पष्ट केली आहे. ३० नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत! यानंतर सर्व प्रचार थांबवावा लागणार आहे.
तिकिटासाठी रस्सीखेच! नेत्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
निवडणुकीच्या या धामधुमीत, विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये आणि नेत्यांच्या निवासस्थानी तिकिटासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. प्रत्येकजण आपली रणनीती आखण्यात आणि नेतृत्वाचे लक्ष वेधून घेण्यात व्यस्त आहे.निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी आणि पक्षांसाठी अत्यंत कडक नियम घालून दिले आहेत. धर्म, जात, पंथावर आधारित प्रचारबंदी: धार्मिक स्थळे किंवा कोणत्याही विशिष्ट जाति/धर्माच्या आधारावर प्रचार सभा आयोजित करण्यास मनाई आहे.
अर्धसरकारी संस्था, सरकारी मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये अस्थायी किंवा कंत्राटी (संविदा) भरती करण्यास प्रतिबंध आहे. तसेच, आधी झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करता येणार नाहीत.प्रचार कालावधी संपल्यानंतर म्हणजेच ३० नोव्हेंबर मध्यरात्री १२ नंतर, व्हॉट्सॲप, फेसबुक, ‘एक्स’ (ट्विटर) इत्यादी सोशल मीडियावर कोणतीही प्रचार सामग्री प्रसारित करणे वर्जित आहे.
मतदानाच्या दिवशी, उमेदवार किंवा पक्षांना मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी वाहन वापरण्याची परवानगी मिळणार नाही. याशिवाय, मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणारा प्रतिनिधी हा फक्त त्याच वॉर्डचा रहिवासी असणे अनिवार्य आहे, आणि त्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्याला २४ तास आधी देणे बंधनकारक आहे.या सर्व नियमांमुळे उमेदवारांना प्रचारासाठी अत्यंत मर्यादित आणि नियोजित वेळ मिळणार आहे. आजपासून शहरात निवडणुकीचे वातावरण तापणार असून, सर्वांचे लक्ष आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेकडे लागले आहे.

