>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच, भारतीय जनता पक्षाने (भाजप) विदर्भात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पाऊले उचलली आहेत. भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या चार नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
हेही वाचा | नगर विकास आघाडी’ ची नवी मोट
यासोबतच, अनुभवी संघटक तसेच माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांची जिल्हा निवडणुक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बाळबुद्धे यांचा राजकीय अनुभव व प्रभावी संघटन क्षमता यामुळे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे. निवडणूक यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे.दीर्घकाळ जिल्हाध्यक्ष म्हणून अनुभव व कुशल संघटनात्मक कौशल्य लक्षात घेऊन त्यांना ही संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
‘फुके फॅक्टर’ने विरोधकांना धडकी
राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा करताच भाजपने आपली यंत्रणा सक्रिय केली आहे. जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, पवनी आणि साकोली या चार नगरपालिका निवडणुकीसाठी डॉ. परिणय फुके यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया भागातील भाजपचे मजबूत नेते म्हणून ओळखले जाणारे आ. फुके यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद दुप्पट होईल आणि विरोधकांना धडकी भरेल, असा विश्वास पक्षाला आहे.
हेही वाचा | नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन ऍक्शन मोडवर
फुके यांच्या नेतृत्वाखाली भाजप चारही नगरपालिकांमध्ये ‘कमळ’ फुलवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. पक्षाकडून ओबीसी मतदारांना केंद्रस्थानी ठेवून, ८० टक्के उमेदवार ओबीसी समाजातून दिले जाणार आहेत. पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असला तरी, महायुतीतील इतर घटकांशी योग्य समन्वय राखला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही जिल्ह्यात भाजपला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजपने आ. फुके यांच्यासारख्या प्रभावी नेत्यावर सोपवलेल्या या जबाबदारीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंतिम निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होईल. भंडारा जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलणार की विरोधकांकडे विजयाची माळ जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

