>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
भंडारा नगरपरिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांमधील कथित २५ ते ३० टक्के कमिशन घोटळ्यावरून सत्ताधारी भाजपमध्येच घरचा आहेर देण्याची बाब घडली आहे. भाजप आमदार परिणय फुके यांनी नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर, मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) चे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ‘बालिश’ आणि ‘अस्वस्थ’ म्हणून चांगलाच धडा शिकवला.
राजकारणात मॅच्युअर व्हा, अन्यथा संजय राऊतसारखे होऊन महत्त्वच उरणार नाही,” असा खोचक सल्ला भोंडेकर यांनी फुके यांना दिला आहे. या वादाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत.
फुके यांचा ‘घरचा आहेर : कमिशनशिवाय कामे होत नाही
भंडारा नगरपरिषदेतील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी (२५ ऑक्टोबर) केला होता. “नगरपरिषदेतील कामे मंजूर होण्यासाठी २५ ते ३० टक्के कमिशन द्यावे लागते, अन्यथा कामे होत नाहीत. यामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असून, सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे,” असे फुके यांनी स्पष्टपणे सांगितले. भाजपचीच सत्ता असलेल्या राज्यात स्थानिक संस्थांमध्ये असा भ्रष्टाचार होत असल्याची कबुली देणे, म्हणजे फुके यांनी सत्ताधारी दलालाच घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे.
फुके यांनी यापूर्वी भंडारा-गोंदिया विधानपरिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली असून, भाजपचे त्यांचे वजन ओळखले जाते. मात्र, या आरोपामुळे भंडारा नगरपरिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विरोधकांनीही हा मुद्दा हातात घेतला आहे. फुके यांनी २०० कोटी रुपयांची विकास कामे झाल्याचे मान्य केले असले तरी, कमिशनचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी स्थानिक पातळीवरील सत्ताधाऱ्यांवर थेट टीका केली आहे.
भोंडेकरांचा ‘जसेचा तसेच’ प्रत्युत्तर : ‘बालिशपणा बंद करा
फुके यांच्या आरोपांना भोंडेकर यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. “परिणय फुके हे बालिश आहेत. मला वाटले होते की राजकारणात मॅच्युअर असतील, पण ते बालिश पनासारखे उत्तर देतात. असा सल्ला भोंडेकर यांनी दिला. राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही मिळून चांगले सरकार चालवत आहेत. फुके यांनी २०० कोटी रुपयांची विकास कामे झाली असं मान्य केले. पण वास्तवात भंडाऱ्यात ७०० कोटींची कामे आणली आहेत. हे म्हणतात भ्रष्टाचार झाले. तर, उद्या तिरोळा, गोंदियातही असेच म्हणतील
भोंडेकर यांनी फुके यांना आवाहन करत म्हटले, “परिणय फुके यांना आवरायला पाहिजे. अन्यथा, जशी शिवसेनेत संजय राऊत आहेत तशी अस्वस्थ परिणय फुके यांची होईल. भविष्यात कोणीही महत्त्व देणार नाही.” हा सल्ला देऊन भोंडेकर यांनी फुके यांच्या आरोपांना पूर्णपणे नाकारले. भोंडेकर हे भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार असून, नगरविकास खात्याशी संबंधित असल्याने त्यांचे म्हणणे स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर अधिक वजनदार ठरत आहे.
राजकीय वातावरण तापले : विरोधकांकडून संधी?
या वादाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. फुके यांचे आरोप आणि भोंडेकर यांचे प्रत्युत्तर यामुळे सत्ताधारी महायुतीतच अंतर्गत कलह उफाळून आल्याचे चित्र आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने हा मुद्दा हातात घेतला असून, “भाजपच्या सत्तेतच भ्रष्टाचाराची कबुली” असा हल्लाबोल करत आहेत. भंडारा नगरपरिषदेतील कामकाजाची चौकशीची मागणीही जोर धरू लागली आहे. भंडारा नगरपरिषदेतील हा ‘कमिशन घोटाळा’चा वाद आता राज्यस्तरीय होण्याची शक्यता आहे. फुके-भोंडेकरांमधील ही खडाजंगी सत्ताधारी दलाची एकजूट कितपत टिकेल, यावर सर्वांचे डोळे आहेत.

