>>>>>>भंडारा चौफेर | लाखांदूर प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर येथे सन २०२२-२३ या वर्षात तत्कालीन प्रशासकाच्या कार्यकाळात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या कामांतर्गत एकूण 1.87 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. लाखांदूरच्या कृउबास यांच्या लेखापरीक्षण अहवालात वरील आरोप करण्यात आले आहेत.
माहितीनुसार, लाखांदूर येथील कृउबास येथे शनिवारी (दि. 28 सप्टेंबर) वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती डॉ.सुरेश ब्राह्मणकर होते. यावेळी बाजार समितीच्या संचालक मंडळांतर्गत गेल्या वर्षभरात झालेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यात आली. तर उपरोक्त कामांतर्गत झालेल्या खर्चाची माहिती देऊन मंजुरीही देण्यात आली.
दरम्यान, सन 2022-23 मध्ये झालेल्या विविध विकास कामांतर्गत बाजार समितीला प्राप्त झालेले लेखापरीक्षण अहवाल जाहीर करण्याची मागणी सर्वसाधारण सभेत उपस्थित काही सदस्यांनी केली. दरम्यान, बाजार समिती प्रशासनाअंतर्गत जारी करण्यात आलेल्या लेखापरीक्षण अहवालानुसार सन 2022-23 मध्ये झालेल्या विविध 25 कामांत एकूण 1 कोटी 87 लाख 84 हजार 424 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मात्र, सदरचा गैरकारभार तत्कालीन प्रशासकाच्या कार्यकाळात झाला असल्याने शासनाच्या सूचनेनुसार याप्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सभापती सुरेश ब्राह्मणकर यांनी दिली.
सभापती सुरेश ब्राह्मणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सर्वसाधारण सभेत उपसभापती देविदास पारधी, संचालक सुभाष राऊत, मनोहर राऊत, लोकेश भेंडारकर, प्रकाश चुटे, प्रमोद प्रधान, रजनी घोनमोडे, देशमुख, मनोज मेश्राम, ओमप्रकाश सोनटक्के, डेलीस ठाकरे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. इतर संचालक व शेतकरी उपस्थित होते. संचालक राजू शिवणकर यांनी ही बैठक घेतली. तर आभार सभेच्या अध्यक्षांनी मानले.
तालुक्यामधील विविध व्यक्तींचा सत्कार
कृषी, शिक्षण, व्यापार, हमाल, अडतीया (दलाल), महिला बचत गट, ग्रामपंचायत, पत्रकार आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या तालुक्यामधील काही व्यक्तींचा कृउबास संचालक व कर्मचाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ज्यामध्ये जगमोहन भैय्या, गोपीचंद राऊत, श्रीकांत बावनकुळे, आदर्श उद्योजक किसन भेंडारकर
आदर्श शिक्षक चित्रगुप्त अहिरकर, आदर्श शेतकरी दिलीप ब्राह्मणकर, गुणवंत विद्यार्थी तुषार राहेले, करिष्मा मावळे, सिद्धार्थ सिंगाडे, आदर्श वार्ताहर म्हणून नरेद्र रामटेके, हमाल भैयालाल शिवणकर, रवींद्र राऊत, सुरेश मेश्राम, आदर्श प्रक्रिया परवाना परिमल शीतल शृंगारपवार, विजयालक्ष्मी राईस मिलचे अध्यक्ष स्वप्नील हटवार, आदर्श सरपंच अस्मिता, सरपंच अस्मिता लांडगे, संचालक मनोज मेश्राम यांच्यासह विविध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

