>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत भंडारा जिल्ह्याने पुन्हा २०१९ मधील विद्यमान आमदारांनाच लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. या तीन विद्यमान आमदारांमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे नरेंद्र भोंडेकर व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राजू कारेमोरे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडा साफ केल्याने जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण झाले आहे.
नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये जिल्ह्यातील या दोघांपैकी एकाचा समावेश होण्याची शक्यता असली तर प्रत्यक्षात मात्र भाजपचे विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदी आ. नरेंद्र भोंडेकर की आ. परिणय फुके यांची उत्सुकता लागली असली तरी पुन्हा परंपरेनुसार जिल्ह्याबाहेरच्या पालकमंत्री लादला जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीचा निकालानंतर आता जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता लागली आहे. यापूर्वी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. आता पुन्हा नरेंद्र भोंडेकरसह आ. राजू कारेमोरे व डॉ. परिणय फुके मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत.
सरकारचा नवीन फार्मुल्यानुसार पालकमंत्री होण्याचे आ. नरेंद्र भोंडेकर व आ. परिणय फुके यांचे स्वप्न सत्यात उतरणार की पुन्हा जिल्ह्याबाहेरचा पालकमंत्री होणार याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारल्याने महायुतीचे तीन पैकी दोन उमेदवार निवडून आले आहेत.
महायुतीतील या आमदारांपैकी कोणाला मंत्रिमंडळात संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. आ. नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाने यापूर्वी हुलकावणी दिली होती; पण आता महायुतीची निर्विवाद सत्ता आल्यामुळे मंत्रिपदाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार भोंडेकर व भाजपचे आ. परिणय फुके मंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यापैकी कोणाला मंत्रिपद मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. याबाबत सध्या मुंबईत मोठ्या घडामोडी सुरु असून कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे.
तो ‘बॅकलॉग’ आता भरून निघणार
राज्यात महायुतीला २३६ जागांवर विजय मिळविला असून, जनतेने बहुमत दिले आहे. त्यातच भंडारा जिल्ह्यातून तीन पैकी दोन जागांवर महायुती जिंकली आहे. त्यामुळे महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते? याकडे नजरा लागल्या आहेत.
महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्याने आज किंवा उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली जाणार आहे. तथापि, गत अडीच वर्षांत महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याला मंत्रिपदापासून डावलले होते, तो ‘बॅकलॉग’ आता भरून निघणार असल्याचे संकेत आहेत.