>>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाच्या घडामोडींना अधिक वेग आल्याचे चित्र आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातील ३ जागांबाबत महायुतीत जागावाटपासोबत संभाव्य उमेदवारांची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व साकोली विधानसभा मतदारसंघातील भंडारा शिवसेनेला, तुमसर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला व साकोली भाजपला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या जागावाटपावरून सुरु असलेल्या चर्चेत २०१९ मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली होती, २०२४ मध्येही त्याच पक्षाने ती जागा लढावी असा तिनही पक्षात ठरले आहेत. जेथे जागा जिंकली नसेल, तेथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाच्या वाट्याला ती जागा जाईल असे सूत्र ठरवण्यात आले आहे.
याच अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व साकोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव ठरल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. विशेष सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा विधानसभेतून शिंदे सेनेच्या धनुष्यबाणावर आ. नरेंद्र भोंडेकर, तुमसरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळीवर विद्यमान आ. राजू कारेमोरे तर साकोलीत भाजपच्या कमळावर माजी आ. राजेश (बाळा) काशीवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असल्याचे माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
तिन्ही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे, हे विशेष. दरम्यान, जिल्ह्यातील तिन्ही निधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता मतदारांसह राजकिय पंडितांनीही वर्तविली आहे. त्यातच महायुतीच्या समीकरणांमुळे तिन्ही पक्षात, इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा झाल्यावर उड्या मारणाऱ्या नेत्यांचाही मोठा पोळा फुटेल.

