>>>भंडारा : चौफेर प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता अॅक्शन मोड मध्ये आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय बॅनर्स हटविण्यास सुरुवात केली आहे. भंडारा शहरासह साकोली, तुमसर आणि पवनी नगरपालिका हद्दीतील राजकीय नेत्यांचे बॅनर्स आणि पोस्टर्स काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कारवाईमुळे मागील अनेक दिवसांपासून बॅनर्स आणि पोस्टर्सच्या विळख्यात अडकलेल्या शहरांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.
प्रशासन कामाला लागले, नेतेमंडळी ‘सायलेंट’
निवडणुकीची चाहूल लागताच अनेक महत्त्वाचे चौक आणि भिंती राजकीय बॅनर्स आणि पोस्टर्सने पूर्णपणे झाकून टाकले होते. यामुळे शहरांचे अतोनात विद्रूपीकरण झाले होते. नागरिकांकडून नाराजीचा सूर उमटत होता. नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आता या अनधिकृत जाहिरातबाजीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत बॅनर्स हटवले आहेत. यामुळे झाकले गेलेले महत्त्वाचे चौक आणि रस्त्यांचे कोपरे पुन्हा एकदा दृष्टीस पडू लागले आहेत.
आचारसंहितेचा धाक
निवडणूक आयोगाने घोषणा करताच आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. त्यामुळे ‘आचारसंहितेचा भंग’ होऊ नये म्हणून आता नेत्यांनीही ‘पोस्टरबाजी’ थांबवली आहे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे ‘जागा’ झालेली नेतेमंडळी आता काही दिवस तरी सायलेंट मोड मध्ये असणार हे मात्र निश्चित.नेत्यांचे बॅनर्स हटल्याने शहराला नवी झळाळी मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे.

