>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
शिस्तबध्द व संघनिष्ठ समजल्या जाणाऱ्या भाजपला अतिआत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे लोकसभेत फटका बसला. त्यातही डीएमके म्हणजेच दलित, मुस्लिम आणि कुणबी मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली. एकीकडे यातील दलित आणि मुस्लिम मते भाजपलाच मिळणारच नाहीत असे गृहीत धरून फक्त “ए’, “बी’ बूथवर लक्ष केंद्रित करणाऱ्या भाजपने आता दलित आणि मुस्लिम मतदार असलेल्या “सी’आणि “डी’ बूथसाठी पालक कार्यकर्ते नेमण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
हेही वाचा : भाजपाचे राजकारण नाही तर सत्ताकारण : आ. नाना पटोले यांचा घणाघात
भाजप राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पाऊल फुंकून टाकत आहे. म्हणून भाजपने राज्यातील ९८,१४८ बूथचे “ए’, “बी’, “सी’ आणि “डी’असे वर्गीकरण केले आहे. या सोबतच बूथ व्यवस्था अधिक मजबूत करणे आणि प्रत्येक बूथवर किमान ५१% मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बूथ व्यवस्था ही भाजप निवडणूक यंत्रणेचा कणा आहे. हा कणा लोकसभेत वाकला होता. ४०० निवडून येणारच आहेत, या विश्वासाने बूथप्रमुख, पन्नाप्रमुख, शक्ती प्रमुखांनी पूर्ण क्षमतेने कामच केले नाही. परिणामी चांगलाच फटका बसला. विधानसभेत असा दगाफटका बसू नये म्हणून बूथचे वर्गीकरण केले आहे.
हेही वाचा : जिल्ह्यात महायुतीचे शिलेदार ठरले ? एक बाण, एक घडी, एक फुल
यात ‘ए’ म्हणजे भाजपला ५०% मते मिळालेले बूथ, ‘बी’ म्हणजे प्रयत्न केल्यास मिळू शकणारी मते, ‘सी’ म्हणजे मिळण्यास दुरापास्त मते आणि ‘डी’ म्हणजे कुंपणावरची मते असे हे वर्गीकरण आहे. यातील “सी’ आणि “डी’ बूथवरील मते म्हणजे दलित आणि मुस्लिम मते आहेत.
मात्र, ते उघडपणे बोलता येत नाही म्हणून मिळण्यास दुरापास्त मते आणि कुंपणावरची मते असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र दोन्हीकडे सुशिक्षित मतदार भाजपकडे वळू शकतात हे लक्षात घेता आता पालक कार्यकर्ते नेमण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. याशिवाय पराभव झालेल्या बूथचे चिन्हांकन करून अशा बूथसाठी विशेष योजना तयार करण्यात येत असल्याचे सूत्रांनी या वेळी बोलताना सांगितले.
कार्यकर्ते शिक्षक आणि शेतकऱ्यांचीही भेट घेणार
जनसंघाच्या काळातील तसेच भाजपच्या विद्यमान ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, युवक, शेतकरी, व्यावसायिकांना भेटणे, शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भेटी घेणे, समाजावर प्रभाव टाकून असलेल्या धार्मिक, सामाजिक तसेच पुरस्कारप्राप्त व्यक्तींची भेट घेऊन चर्चा करणे, अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्यांची भेट घेत संवाद साधणे असे कार्यक्रम कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजयुमो बूथफेरी काढून देणार विविध योजनांची माहिती
प्रत्येक वर्गापर्यत पोहोचण्याच्या दृष्टीने भाजयुमो कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवरून किमान ११ मोटरसायकलसह बूथफेरी करण्याचे नियोजनही केले आहे. महिला आघाडी लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची माहिती देण्यासाठी बूथअंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांशी संपर्क साधणार आहे. तर भाजप ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती मोर्चाचे कार्यकर्ते समाजाशी संपर्क साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.