लाखनी : रब्बी हंगामातील धान पिक, मक्का आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांपुढे वीज पुरवठ्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. पिके जगविण्याची चिंता असलेल्या शेतकऱ्यांनी ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दी.७) मार्च रोजी लाखनी येथील माहवितरण कार्यालयावर धडक देवून अखंडीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली.कृषी पंपांना अपुरा वीज पुरवठा, वारंवार वीज खंडित होणे आदी विजेच्या समस्यांनी त्रस्त जवळपास ३०० शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून उद्भवलेली समस्या निकाली काढण्याची मागणी केली.
भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्ह्णून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. मात्र, खरिप हंगामात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला आणि आता रब्बी हंगामातही सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मिरेगाव, सोनमाळा आणि बरड/किन्ही येथे नवीन फिडर बसविण्याची मागणी शेतकर्यांनी यावेळी केली आहे.
सोनमाळा, मिरेगाव, बरड/किन्ही हे गाव जंगलव्याप्त भागात येत असून, मागील अनेक वर्षांपासून नियमित २४ तास वीजपुरवठा वितरित होत असतांना अचानकपणे ८ तास तुटक विजपुरवठा केल्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पीक, मक्का, आणि भाजीपाला पिकाचे नुकसान होत आहे.त्यामुळे पीक पिकवायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मिरेगाव, सोनमाळा, बरड/किन्ही क्षेत्र नुकसानग्रस्त घोषित आहेत. या क्षेत्रामध्ये वाघ, तसेच इतर जंगली हिंसक प्राण्यांनी धुमाकूळ घातला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. महावितरण कार्यालयाकडून अचानकपणे नियमित विज खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांनवर उपासमारीची वेळ आली आहे. होणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवावे याकरिता लाखनी येथील महावितरण कार्यालयातील उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, राजेश मेश्राम, श्रावण साठवणे, चक्रधर तितीरमारे, शंभु जवंजार, ग्यानीराम पाखमोडे, भारत पाखमोडे, रविंद्र चिमणकर,सुनील रामटेके, आशीर्वाद रामटेके, ज्ञाणेश्वर देशपांडे, विठोबा हटवादे, अनिल काडगाये, नाणेश्वर बोंदरे, तारा गायकवाड, मंगल पुस्तोडे आदींसह इतर शेतकरी होते.
लाखनी तालुक्यात सगळीकडे एकसारखी समस्या आहे. त्यामुळे किमाम १६ तास वीज उपलब्ध करावे अन्यथा जणआंदोलन उभारण्यात येईल. शासनाने गांभीर्याने याची दखल घ्यावी
– धनंजय लोहबरे
जिल्हाअध्यक्ष शेतकरी संघटना
प्रत्येक दिवशी हा विद्युत पुरवठा खंडित होत असून, सद्या रब्बी हंगामा असल्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पंप चालण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. वारंवार होणाऱ्या खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
-रवींद्र खोब्रागडे
पंचायत समिती सदस्य, लाखनी