>>>>>>भंडारा चौफेर : विशेष प्रतिनिधी
देशाच्या राजकारणात ‘पार्टी विथ डिफरन्स’ किंवा शिस्तबद्ध पक्ष स्वतःला म्हणवून घेणारा एक पक्ष आहे. आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे, असा त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा समज आहे. आता त्याच शिस्तबद्ध पक्षाच्या काचेच्या महालाला पक्षातील नेत्यांमुळे बंडखोरीचे तडे गेल्याचे साकोली विधानसभा निवडणुकीत दिसत आहे.
हेही वाचा : साकोली विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढतीचे रणकंदन
महाराष्ट्र विधानसभेची यंदा निवडणूक अतिशय चुरशीची होत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघात सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची अंतिम घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांची निराशा झाली आहे. वर्षानुवर्षे पक्षात काम करूनही उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी आता बंडखोरी केली असून, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
थोरल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांच्या गृह मतदारसंघ असलेल्या साकोलीत शिस्तबद्ध पक्षाला स्वःताची खासगी मालमत्ता समजणाऱ्या नेत्याची नाराजी ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षाला अडचणीत आणणारी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा : राज्यात ५ वर्षांत, ३ सरकार…, २ पक्षांची ४ शकले
शिस्तबद्ध पक्षाचे नेते व माजी आमदारांसह मतदारसंघात एकनिष्ठेने पक्षासाठी काम करणाऱ्यांना डावलून रात्रीस खेळ चाले याप्रमाणे धाकट्या काँग्रेसकडून ‘शौ’की पावतीवर जातीवंत उमेदवार आयात करण्याचा डाव रचला गेला. आपला डाव साधणार नाही हे बड्या नेत्याला लक्षात येताच धाकट्या काँग्रेसकडून आयात केलेल्या व्यक्तीला अधिकृत उमेदवारी जाहिर करत ऑनलाईन पक्ष प्रवेशाचा रात्रोत्सवही साजरा करण्यात आला.
दरम्यान, इच्छुकांनी शिस्तबद्ध पक्षाकडून तिकीट न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाशी अनेक वर्षे एकनिष्ठ राहून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. साकोलीतून जातीवंत आयरामाला तिकीट दिल्यानंतर सर्व इच्छुकांनी एकमत करीत एका इच्छुकाचा एकदिलाने आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
बंडखोर हे पक्षीय उमेदवारांसाठी धोकादायक?
कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार आणि कोण कुणाकडून लढतोय, हे ओळखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या मेंदूचा पार भुगा झाला आहे. बंडखोरांनी उमेदवारांना घाम फोडला आहे. त्यामुळे उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच पक्षीय उमेदवारांच्या मुळावर उठला आहे. त्यामुळे बंडखोर हे पक्षीय उमेदवारांसाठी धोकादायक ठरू शकतात.
नगरसेवकपदाची निवडणूक असो वा खासदारकीची, एकदा निवडून येण्याची प्रत्येक पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणार, असा विश्वास अनेक बंडखोरांना होता.
मात्र, विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपले नावच नसल्याने इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आणि थेट पक्षश्रेष्ठींना आव्हान देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र आता याच बंडखोरांची बंडखोरी पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ४ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे ४ नोव्हेंबरपूर्वी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे.

