राजकारणात कार्यकर्ते हे बागेतील शोच्या झाडासारखे वापरले जातात. ही झाडे वाजत गाजत लावली जातात. सुरुवातीची वाढ झपाट्याने व्हावी यासाठी खतपाणी घातले जाते. परंतु एकदा ती झाडे दोन-तीन फुटाची झाली कि त्यांना काटून (ट्रिमिंग) करून त्याला आहे तेवढ्याच उंचीचे ठेवले जाते. हे झाड मरू द्यायचे नाही, वाळू द्यायचे नाही आणि मरू तर अजिबात द्यायचे नाही, अशी पद्धत वापरली जाऊन त्या बागेचे सुशोभीकरण सदैव राखले जाते.
हेही वाचा : भावी आमदार ! साकोली मतदारसंघात आता ‘या’ जि. प. सदस्याचे झळकले बॅनर
यालाच सत्तेचे समीकरण म्हणतात हे आतापर्यंत आपण कुठेतरी वाचलेच असणार. मात्र, यात आता अजूनही वाढ झालेली आहे. शेजारच्यांच्या बागेतील चांगली झाडे आपल्या बागेत आयती उचलून पहिल्या झाडांच्या शेजारी ठेऊन पोसली जातात. मात्र, पहिल्यापासून बागेचे सौन्दर्य खुलवणाऱ्या झाडांकडे दुर्लक्ष केले जाते. आता हेच होत आहे, सध्याच्या राजकारणात!
एक विचार, एक झेंडा, एक पक्ष अन् एकच नेतृत्व मानत राजकारणात उतरणाऱ्या व भाऊ, दादा ही बिरुदावली लावत स्वतःला भूमीपुत्र वा शेतकरी पुत्र म्हणणाऱ्या नेत्यांनी याआधीच्या पक्षीय विचारला बाजूला सारत आताचा स्टेबल नेता मीच नेता, मीच पक्ष, मीच विचार आणि मीच नेतृत्व अशाप्रकारची विचारसरणी सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात सुद्धा दिसून येत आहे.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राजकीय हालचालींना वेग
आपआपल्या मतदारसंघामध्ये विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतून आपलेच नेतृत्व वाढविण्यासाठी कंत्राट वाटप, निवडी, बदल्या, योजना, समित्या बनवत व्यक्तिकेंद्रित व स्वहिताचे राजकारण केले जात आहे. वरिष्ठ नेतृत्वाच्या अनबनीतून पक्षत्याग करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे “भाऊ जहाँ , हम वहाँ” असे म्हणत या नेत्यांचे ठेकेदार कल्चर जोपासणारे दलाल आता सर्वत्र दिसत आहे.
या नेत्यांमागे जाणारे कट्टर, निष्ठावंत पहिल्यापासूनच या बगावतींची जाण ठेऊनच पेरली जातात. गावागावातील काही गावनेते एका पक्षामधून जनसेवक होण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेलेल्या व आता ऐन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पूरते जनसेवेत (?) असलेल्या नेत्यांच्या लक्ष्मीदर्शन घेतलेल्या व्यक्ती निष्ठावंतांकडून हेच नारे देण्यात आले. आणि हेच नारे स्वयंघोषीत नेत्यांच्या बाबतीतही ऐकायला मिळतील. राजकारणातला मित्र, नाटकातील पात्र आणि चित्रपटातील चित्र कधीच स्थिर नसतात.
हेही वाचा : ‘लाडकी बहिण’ योजना म्हणजे मतांसाठी केलेला जुगाड
दहा, वीस, पंचविस वर्षे सत्तेत राहून कार्यकर्त्यांना आपल्या हातचे बाहुले समजणाऱ्या व सतत पलटणार्या नेत्यांमुळे सामान्य कार्यकर्त्यांचे हाल मात्र किती वाईट होवू शकतात याचा अनुभव विधानसभा निवडणुकीत या नेत्यांना लवकरच येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. २५ /१५, ३०/ ५४, ५०/ ५४ व जनसुविधे अंतर्गत मिळणाऱ्या कामांसाठी गावागावातील ही ठेकेदार कल्चर जोपासणारी नेतेमंडळी सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात जातात तेव्हा पक्षाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांची जी वाताहत होते तिच्याकडे कोणीच पाहत नाही.
कार्यकर्ता होणे म्हणजे उष्ट्यावर जगण्यासारखे झालेले आहे. वरच्या लेव्हलवर सर्व काही मॅनेज होऊन खाली पक्षवाढीसाठी केलेले निष्ठेचे प्रयत्नांवर पाणी सोडण्यात येते. पक्षवाढीसाठी करण्यात येणाऱ्या राजकीय कार्यातून आणि त्यांच्या यशातून जे राजकीय वैमनस्य तयार होते त्याच्या परिपाकाचे फलित त्या कार्यकर्त्यांनाच भोगावे लागते. पोलिस ठाण्यात अर्धे प्रकरणे राजकीय वैमनस्याचाच परिपाक असतात.
हेही वाचा : पटोलेंचा पराभव करणे ‘हे’ भाजपासाठी आव्हानच?
लोकमान्य, प्रसिद्ध राजकीय पुढारी जेव्हा इकडून तिकडे अन तिकडून इकडे येतात तेव्हा ते त्यांच्या पाठीवरच विंचवासारखे बिऱ्हाड घेऊनच राजकारणात धष्ट्पुष्ट होतात. मात्र, यात जो पक्ष, विचार, नेतृत्व, झेंडा बघत एकनिष्ठ असतो तो भरडला जाऊन शेवटी या अशा कार्यकर्त्यांच्या माथी उष्टी वाटीतलेच मारले जाते.

