>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आगामी ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (BJP) भारतीय जनता पक्षात (भाजपा) मोठा बदल घडला आहे. पक्षाने नुकतीच (Ashu Gondane) आशू गोंडाणे यांची भंडारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. या बदलामुळे साकोलीतील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहासह काही चिंताही व्यक्त होत आहेत. नवे जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातील समन्वय येत्या निवडणुकीत भाजपासाठी किती यशस्वी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आशू गोंडाणे यांच्या नियुक्तीमुळे साकोली भाजपात नव्या जोमाने कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, नवे जिल्हाध्यक्ष साकोलीसाठी नवखे असल्याने त्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांशी किती लवकर ताळमेळ जुळतो, यावर निवडणुकीतील यश अवलंबून आहे. निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक असताना पक्षाने हा बदल का केला? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. साकोलीत काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांच्या उमेदवारांशी थेट स्पर्धा असल्याने आशू गोंडाणे यांच्यासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
सर्वच पक्षांत जय्यत तयारी
निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच साकोलीतील सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. भाजपासह इतर पक्षांतही जोरदार खलबते आणि नियोजन सुरू आहे. कोणते उपक्रम राबवले जातील, कोणत्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील, यावर प्रत्येक पक्षाचे लक्ष आहे. साकोलीतील ही निवडणूक कोणत्याही पक्षासाठी सोपी नसेल, विशेषत: भाजपासाठी, कारण येथील राजकीय समीकरणे नाना पटोले यांच्या प्रभावामुळे गुंतागुंतीची बनली आहेत.
प्रकाश बाळबुध्दे यांनी गेल्या तीन-चार वर्षांत भंडारा जिल्ह्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. स्थानिक रहिवासी आणि कोहळी समाजाचे असल्याने त्यांची जनतेत मजबूत पकड होती. त्यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती घरोघरी पोहोचवली, ज्यामुळे सामान्य नागरिकांना लाभ मिळाला. अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
शासकीय अधिकाऱ्यांवर त्यांच्या कार्यशैलीची वेगळी छाप पडली आहे.विविध उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे त्यांनी पक्षाची प्रतिमा उज्ज्वल ठेवली. यामुळे साकोलीत प्रकाशमान चेहरा म्हणून ते ओळखले जातात.आशू गोंडाणे यांच्या नेतृत्वाखाली साकोलीत भाजपा आगामी निवडणुकीत कशी कामगिरी करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पक्षश्रेष्ठींनी केलेला हा बदल साकोलीच्या निवडणूक रणनितीवर कसा परिणाम करेल, हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होणार.