भंडारा : लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील गावकरी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घरकूलांबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जागा उपलब्ध नसल्याने या गावातील शेकडो कुटुंबे मागील ७० वर्षांपासून जीर्ण झोपड्यांमध्ये राहात असून पर्यायी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
बुधवारी (ता. ५) चिचाळ येथील गावकरी व शेतकऱ्यांनी घरकुलांच्या समस्यांबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. बाळबुधे यांनी उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून या समस्यांबाबत अवगत केले. त्यांनी या परखुरांच्या समस्या सोडवण्याची आश्वासन दिलेले आहे.
यावेळी रेखा भाजीपाले, सचिन कुंभलकर, प्रकाश निंबाळकर उपस्थित होते.चिचाळ, कोदामेडी येथील गावकन्यांनी सांगितले की चिचाळ येथील आबादी जागेचे क्षेत्र कमी आहे. तसेच आबादी जागेमध्ये फार पूर्वीपासून लहान लहान घरे व झोपडया बनवलेल्या आहेत. परंतु, लोकसंख्या वाढली. तसे लोकांनी सरकारी जागेमध्ये राहण्यासाठी झोपळ्या बनवलेल्या आहेत.
वॉर्ड क्रमांक एकमध्ये आबादी जगा उपलब्ध नसल्याने सरकारी जागेमध्ये लोक राहत आहेत. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये १५० घरांची वस्ती ७० वर्षांपासून वास्तव्यात आहे. मागील ७० वर्षांपासून गोदामेडी येथे २०० नाथजोगी समाजाच्या झोपड्या बांधलेल्या आहेत. त्यांना अजूनही घरकुल मिळालेले नाही. हे लोक ग्रामपंचायतच्या सरकारी जागेत राहत असल्याने त्यांच्या घराची नोंद ग्रामपंचायत नमूना आठमध्ये सरकार अशी केली आहे.
त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असूनही या सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा करारनामा केला जात नाही. ग्रामपंचायत येथील ७० लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. गावकऱ्यांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांची भेट घेऊन निवेदन दिले व समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.