>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून अनेक नेते पक्षांतर करत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर खिंडार पडत आहेत. अशातच आता भाजपला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. कारण भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर शुक्रवारी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
हेही वाचा : आचारसंहिता १३ ऑक्टोबरपासून ? सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचीही लगबग सुरु
त्यांनी इंदापूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. त्यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटाची ताकद वाढली असून, सत्ताधारी महायुती विशेषतः भाजपला जोरदार झटका बसला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूर येथे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
हेही वाचा : भावी उमेदवारांनी घेतला ‘लिफाफा सर्व्हे’ चा धसका?
या बैठकीनंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, मागील काही महिन्यांपासून मी तालुक्यात फिरत आहे. त्यात सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्याकडे विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. त्यानुसार मी काल शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. या बैठकीत आमची सखोल चर्चा झाली. पवारांनीही माझ्याकडे निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. हा आग्रह जनतेचाच असल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील ‘तुतारी’हाती घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. यानंतर काल हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेत यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्याचे समजले. तसेच पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात होता.
हेही वाचा : सत्तेच्या पटलावरही ‘नवदुर्गा’ मोठ्या संख्येने प्रस्थापित व्हावी
राजकारण कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसते
पत्रकारांनी यावेळी हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही आतापर्यंत नेहमीच पवारांवर टीका केली आणि आज तुम्हीच त्यांच्या पक्षात जात आहात? असा थेट प्रश्न केला.
त्यावर पाटील यांनी राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसतात असे स्पष्ट केले. ते म्हणाले, राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसते. आमचे पवारांशी खूप जुने व चांगले आहेत. आज मी निर्णय घेतला म्हणून माझे इतर पक्षांच्या नेत्यांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत. राजकारण व समाजकारणात संबंध टिकवावे लागतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती संस्कृती टिकवण्याची आपली जबाबदारी आहे.