>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
जिल्ह्यात राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी या चारही नगरपालिकांच्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. रविवारी (दि. २६) अधिकृत चिन्ह वाटप होणार असले तरी, उमेदवारांनी त्याआधीच ‘एकास एक’ प्रचारयुद्धाला तोंड फोडले आहे.
प्रचारासाठी अत्यंत मर्यादित कालावधी मिळाल्याने ४९ प्रभाग, १०० नगरसेवक आणि ४ नगराध्यक्ष पदांसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना प्रभाग पिंजून काढण्यासाठी दिवस-रात्र एक करावी लागत आहे. राजकीय फेरबदल, जुन्या-नव्या समिकरणांची जुळवाजुळव, नाराजी नाट्यामुळे अनेक ठिकाणी लढतींना ‘विलक्षण’ रंगत आली आहे. नव्या चेहऱ्यांचा उदय व अनुभवी दिग्गजांना अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष, हे या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरत आहे.
मतदारांचा थेट सवाल: “९ वर्षांत काय केले?
२०१६ नंतर तब्बल ९ वर्षांनी या नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या दीर्घ अंतरामुळे मतदारांमध्ये कमालीची जागरूकता दिसत आहे. उमेदवार भेटीला आल्यास मतदार थेट ‘कामाचा हिशेब’ मागत आहेत, ज्यामुळे मागील कारकिर्दीत प्रभावी काम न केलेल्या माजी नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची जुन्या कामांचा लेखाजोखा मांडताना दमछाक होत आहे. याच नाराजीचा फायदा तरुण, नवे उमेदवार घेत असून, ते ‘बदल’ आणि ‘झंझावाती विकास’ ची भाषा बोलत मतदारांना आकर्षित करत आहेत.
अपक्षांची ‘खेळी’ पायाभूत सुविधांची वानवा
अनेक प्रभागांत तिकीट न मिळालेल्या दिग्गजांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना प्रचारासाठी कमी वेळ असला तरी त्यांनी आपली यंत्रणा सक्रिय केली आहे. अनेक ठिकाणी हे अपक्ष उमेदवार प्रमुख राजकीय पक्षांचे समीकरण बिघडवून निकालावर मोठा प्रभाव पाडू शकतात. दुसरीकडे, चारही नगरपालिकांमधील जनतेला पायाभूत सुविधांच्या वानवेने ग्रासले आहे. खड्डेमय रस्ते, ढिसाळ पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, गटारांची दुरवस्था अशा ज्वलंत समस्यांमुळे सर्वत्र नाराजीचे वातावरण आहे. उमेदवार प्रचाराला आले की, मतदार त्यांना याच प्रश्नांवरून कोंडीत पकडत आहेत.
जुने ‘दिग्गज’ विरुद्ध नव्या ‘पीढी’ चा नारा
या निवडणुकीत अनेक माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वरिष्ठ नगरसेवक पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांना आपला जुना रेकॉर्ड, दिलेली वचने आणि केलेल्या कामांचा पुरावा मतदारांसमोर सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांच्या तुलनेत मोठ्या संख्येने उदयास आलेले नवे आणि तरुण चेहरे ‘सत्ता बदला’चा जोरदार नारा देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रचार या तरुण उमेदवारांना नवी ताकद देत आहे. “आम्हाला एक संधी द्या, आम्ही शहराचे कायापालट करू”, असा दमदार निर्धार या नव्या पीढीकडून व्यक्त होत आहे. २ डिसेंबरला मत-पेट्यांमध्ये या संघर्षाचे चित्र कैद होणार असून, ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मतदार कोणाच्या हाती कारभाराची सूत्रे देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

