>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी अखेर तुतारी हाती घेतली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यानिमित्ताने शरद पवार गटाची तुमसरात ताकद वाढणार असून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांच्यासह अजित पवारांचे खंदे समर्थक खा. प्रफुल्ल पटेल यांचे देखील टेन्शन वाढणार आहे.
हेही वाचा : पडघम विधानसभेचे : मुलाखतीनंतर आता उमेदवारीची उत्सुकता
लोकसभा निवडणुकीपर्यंत आंध्र प्रदेशातील के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या ‘कार’मधून फिरणारे माजी आमदार चरण वाघमारे यांनी आता वेगळा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी (दि. 13) वाघमारे यांनी अधिकृतपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहेत. त्यामुळे वाघमारे यांचे सिमोल्लंघन पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया जिल्ह्यात महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
हेही वाचा : पडघम विधानसभेचे : आता ‘डीएमके’च्या मतांसाठी भाजप नेमणार बूथनिहाय पालक
आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदारांना बीआरएसची कार पंक्चर केली. त्यामुळे केसीआर यांची सत्ता गेली. याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला आहे. भारत राष्ट्र समितीचे कार्य महाराष्ट्रात थांबले आहे. बीआरएसच्या भवितव्यावरही आता महाराष्ट्रात प्रश्नचिन्ह लागले आहे.
अशात राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नरत असलेले माजी आमदार चरण वाघमारे हे राव यांच्या ‘कार’मधील सिट सोडत शरद पवारांच्या राष्ट्वादीत डेरेदाखल झाले आहेत. तुतारी हातात घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या या माजी आमदाराने महायुतीच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : भाजपाचे राजकारण नाही तर सत्ताकारण : आ. नाना पटोले यांचा घणाघात
जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील एक मोठा राजकीय चेहरा म्हणून माजी आमदार चरण वाघमारे यांच्याकडे बघितले जाते. भंडाऱ्यात आमदार परिणय फुके यांची एन्ट्री झाल्यानंतर चरण वाघमारे आणि परिणय फुके यांचे कधी जमले नाही. त्यानंतर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा वाघमारे यांच्यावर ठपका ठेवत भाजपने त्यांना पक्षातून काढले. त्यानंतर आता त्यांची आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू झालेली आहे.
…तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नाही
भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भरोशावर सुरुवातीपासून चरण वाघमारे यांनी पकड ठेवलेली असून त्यांनी विधानसभा लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. विधानसभा निवडणुकीची चाहुल लागताच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळी चरण वाघमारे यांच्या संपर्कात सुरुवातीपासूनच होते.
त्याचप्रमाणे भाजपची वरिष्ठ नेतेमंडळी वाघमारेंना घरवापसी करण्यासाठी गळ घालत होती. मात्र, भाजपमधून काढल्यानंतर ते आता जोपर्यंत परिणय फुके भाजपात आहे. तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते.
विधानसभा लढणार म्हणून आधीची दिले होते सुतोवाच
चरण वाघमारे यांनी लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना पाठिंबा दिला होता. पाठिंबा जाहीर करताना वाघमारे यांनी विधानसभा निवडणूक मी नक्की लढणार आणि ती लोकवर्गणीतून लढवणार असे आधीच सांगितले होते.
विशेष म्हणजे, जोपर्यंत परिणय फुके हे भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात भाजपात आहेत तोपर्यंत मी भाजपामध्ये प्रवेश करणार नाही, असेही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले होते. आता चरण वाघमारे तुतारी फुंकत विधानसभेची निवडणूक लढणार हे सर्वश्रृत झाल्यामुळे फुके अँड कंपनी त्यांच्या विरोधात कोणती रणनिती आखतात हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

