>>>>चौफेर प्रतिनिधी | नागपूर
नागपूर येथे चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. या महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा कार्यक्रमात भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
या संमेलनात बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा ते एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार, फडणवीस यांचे महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहेत.
या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला, तर ते मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामींचा जन्म जरी गुजरातचा असला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी महानुभाव पंथाला भारतात आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेले. त्यांच्या माध्यमातूनच महानुभाव पंथाची अतुलनीय ग्रंथसंपदा तयार झाली.