>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
राज्यात विभागनिहाय विधानसभा मतदारसंघांचा विचार करता सर्वाधिक ६२ जागा असलेल्या विदर्भात विजय मिळाला की राज्यात सत्ता येते, असा गेल्या तीन निवडणुकांचा अनुभव आहे. परिणामी, २०२४ च्या निवडणुकीचे खरे रणांगण विदर्भ असेल. विदर्भावर झेंडा फडकविण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीत चुरस असली तरी खरा सामना हा भाजप व भाजप, काँग्रेसची धुरा विदर्भाकडेच विदर्भात काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षामध्येच चुरस असून योगायोगाने दोन्ही पक्षाचे नेतृत्व विदर्भाकडेच आहे.
चंद्रशेखर बावनकुळे व नाना पटोले हे दोन्ही प्रदेशाध्यक्ष विदर्भातील आहेत. भाजपचा विधानसभेतील चेहरा असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोघेही विदर्भाचे. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल देशमुख, अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि शिंदेसेनेचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या रूपाने मित्रपक्षाचेही नेतृत्व विदर्भात आहे.
पूर्व व पश्चिम अशा दोन भागात विभागलेल्या विदर्भाने ज्या पक्षाला साथ दिली त्या पक्षाचे सरकार राज्यात आरूढ होते, हे मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतरच्या तीन निवडणुकांच्या निकालाचे सूत्र आहे. पूर्व विदर्भात ३२ तर पश्चिम विदर्भात विधानसभेच्या ३० जागा आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असूनही काँग्रेसचा गड शाबूत होता.
आकडे बोलतात
सन २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस विदर्भात क्रमांक एकचा पक्ष होता. साहजिकच लोकशाही आघाडी सरकारची राज्यात पुन्हा सत्ता आली. २०१४ मध्ये भाजपने तब्बल ४४ जागा जिंकत मुसंडी मारली व १२२ जागांसह राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. २०१९ मध्ये भाजपने विदर्भात १५ जागा गमावल्या. राज्यात भाजप १०६ जागांवर आला. म्हणजे विदर्भातील पीछेहाट हाच फरक राहिला.
लोकसभेला 43 मतदारसंघात आघाडी पुढे
विदर्भातील लोकसभेच्या दहापैकी सात जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला अकरा जिल्ह्यांमधील ६२ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ४३ मतदारसंघांत मताधिक्य मिळाले. १८ मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार पुढे होते, तर बुलढाण्यातील सिंदखेड राजा या एका मतदारसंघात अपक्ष उमेदवार आघाडीवर होता.