>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांत सार्वजनिक निवडणुकांचा चेहरामोहराच बदलून गेला असून, तिकीट वाटपापासून ते कार्यकर्ता मेळाव्यांचे गणित अर्थकारणाभोवती फिरत आहे. पूर्वीही निवडणुकांत पैशांचा वापर होत होताच; नाही असे नाही. मात्र, अलीकडच्या काळातले त्याच भयकारी वटवृक्ष झाला आहे. अगदी सामान्य मतदारही निवडणुका लागल्या रे लागल्या, की किती, कसे आणि कोणाकडून मिळणार, अशाच मानसिकतेत असल्याने हा ‘नोट फॉर व्होट’चा भस्मासूर मूलभूत हक्कांना मारक ठरत आहे.
हेही वाचा : सरपंच संघटनेचा जिल्हा अध्यक्ष उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
अगदी स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांच्या चाहुलीने अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यापूर्वी अशा धावपळीत प्रमुख कार्यकतच हात धुवून घेत असत. फार फार तर त्यांच्या बगलबच्चांची थोडीफार चांदी होत असे. त्यानंतर आपल्या विरोधी कंपूतील मतदारांना चुचकारण्यासाठी पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. तिथून सुरू झालेला नोट फॉर व्होटचा चंचूप्रवेश आता महाकाय झाल्याचे दिसून येत आहे.
अगदी खेड्यापाड्यांपासून ते शहर महानगरातील उच्चभ्रू सोसायट्यांतील मतदारांनीही या मानसिकतेचा स्वीकार केल्याचे दिसते.बरे हा प्रकार पूर्वी चोरीछुपे व्हायचा, आज त्याची जाहीर वाच्यता कार्यकर्त्यांसह नेतेमंडळीही करत असल्याने काही वर्षांनी आयपीएलच्या लिलावासारखीच मतदारांचीही बोली लागते की काय, अशी शंका यायला वाव आहे.
मात्र, हा प्रकार पुराणकथेतल्या भस्मासुरासारखाच आहे. ज्याअर्थी एखाद्याला निवडून देण्यासाठी आपण मोबदला देतो, त्याअर्थी त्याने पाच वर्षांत काहीही काम केले नाही, तर आपण जाब कोणाला विचारणार? लोकशाहीत मतदान असा शब्दप्रयोग रूढ आहे. ते जर कोणी विकत असेल, तर विकासाचे रडगाणे कोणासमोर आणि कसे गाणार? तो अधिकार उरेल का, याचाही विचार करण्याची गरज आहे.
हेही वाचा : साकोली मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यात धुसफुस
हे चित्र बदलण्यासाठी नोट फॉर व्होटच्या भस्मासूराला गाडून टाकत लोकशाहीतील पवित्र कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले. तरच आपणा सर्वांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, अशा अनेक समस्यांबाबत अधिकाराने, हक्काने बोलणे शक्य होईल
‘व्होट बँक’ वाल्या पेढ्यांना ऊत
अनेक कार्यकर्ते सामाजिक कार्याच्या नावाखाली सटरफटर कार्यक्रम राबवून लोकांमध्ये मिरवत असतात. अशा उपक्रमांतून त्यांनी विशिष्ट समाज, लोकांना भुरळ घातलेली असते. निवडणुकीच्या तोंडावर समाजाच्या भल्यासाठी सांगून ते स्वतःच्या उमेदवारीची घोषणाही करतात.
अधिकृत पक्षाचे उमेदवार त्याच्या पदरी असलेल्या व्होट बँकेनुसार त्याची किंमत ठरवतात आणि आयत्या वेळी हा स्वयंघोषित समाजसेवक मोबदला देणाऱ्या उमेदवाराच्या तंबूत घुसून त्याला पाठिंबा देऊन मोकळा होतो. असे प्रकार अगदी तालुकास्तरापासून शहरातील छोट्या छोट्या प्रभागातही घडताना दिसतात.

