>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
मागील आठवड्यापासून संपूर्ण विदर्भात थंडीची लाट पसरली असून, पारा सातत्याने खाली जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम झाला असतानाही, भंडारा शहरातील निवडणुकीची रणधुमाळी मात्र कमालीची तापली आहे. एकीकडे थंडी वाढत असताना, दुसरीकडे प्रचाराची ‘गर्मी’ शिगेला पोहोचली आहे. या कडाक्याच्या गारठ्यातही उमेदवारांनी प्रचाराचे ‘गियर’ वाढवले असून, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे संध्याकाळनंतर प्रचार फेऱ्यांवर परिणाम दिसत असला, तरी नेते आणि त्यांचे समर्थक पहाटेच्या थंडीतही मतदारांच्या भेटीसाठी ‘मॉर्निंग वॉक’ करताना दिसत आहेत. रात्री उशिरापर्यंत बैठका आणि सकाळी लवकर ‘गृहभेटी’ असा उमेदवारांचा दिनक्रम सुरू आहे.
चहाच्या टपरीवर राजकीय ‘दंगल’
शहरातील प्रत्येक गल्ली-बोळात निवडणुकीचेच वातावरण आहे. चहाच्या टपऱ्या, चौका-चौकात आणि गप्पांच्या मैफली आता राजकीय आखाड्यात रूपांतरित झाल्या आहेत. नागरिक उमेदवारांची ताकद, पक्षाची भूमिका आणि मागील विकासकामांचा हिशोब मागत आहेत.अनेक ठिकाणी नागरिकांनी मागील निवडणुकीतील आश्वासने आणि अपूर्ण कामांसाठी नेत्यांना जबाबदार धरले आहे. निवडणुका नसतानाही राजकारण्यांनी अशी तळमळ दाखवली असती, तर अनेक प्रश्न सुटले असते,’ अशी उघड नाराजी जनता व्यक्त करत आहे.
राजकीय समीकरणे आणि भविष्याची चर्चा
या निवडणुकीत जातीय समीकरणे आणि पक्षीय निष्ठा यावरही जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ‘राजकीय विश्लेषक’ बनलेल्या सामान्य नागरिकांमध्ये विजयाचे आणि पराभवाचे भाकीत वर्तवले जात आहेत. थंडीमुळे नागरिकांची ‘मॉर्निंग वॉक’ करण्याची सवय मोडली असली तरी, राजकारणी मात्र प्रत्येक मतदाराची विचारपूस करण्यासाठी घराघरात पोहोचत आहेत. सत्ता मिळाल्यावर सामान्य लोकांना विसरणाऱ्या नेत्यांना यावेळी जनता काय धडा शिकवणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

