■ प्रादेशिक पक्षांना भाजप संपवतो ?
■ जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी, हरियाणात जेजेपीची पिछेहाट
>>>>संदीप नंदनवार | भंडारा चौफेर
हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. हरियाणात विजयाची आशा असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने विजयाचा झेंडा फडकावला. जनतेने देशातील दोन प्रमुख पक्षांना एकाच वेळी जय आणि पराजय दिला. अशातच महाराष्ट्राच्या विधानसभेचा आखाडा आखला जात आहे.
हेही वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
आता फक्त आतुरता आहे ती प्रत्येक मोरक्यांच्या गटातील उमेदवारांच्या निश्चित जागांची. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यापासून ते शहरांपर्यंत महायुतीचा कडकडाट होणार, त्याचबरोबर तुतारीचा निनाद आणि मशालीची धग, अन् काँग्रेसच्या हाताची ताकद लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हे जरी खरे असले, तरी जम्मू काश्मीर व हरियाणातील विधानसभानिवडणुकीच्या निकालामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे.
हेही वाचा : गोंदियाचे विनोद अग्रवाल यांचे निलंबन मागे : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले जाहीर
भाजपवर आतापर्यंत अनेकदा आपल्या मित्रपक्षांना संपवण्याचा आरोप झालेला आहे. कधीकाळी जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती आणि हरियाणामध्ये जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांनी भाजपसोबत जाऊन अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यंमत्रीपद भूषवले. तर अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपद मिळवले. त्यामुळे मुफ्ती व चौटाला यांची घसरगुंडी पाहून या दोघांच्याही पोटात गोळा आला तर त्यात नवल करण्यासारखे काही नाही.
हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रादेशिक पक्षांची जबरदस्त पिछेहाट झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपसोबत घरोबा करून नंतर काडीमोड घेणाऱ्या पीडीपीची पिछेहाट झाली. तर हरियाणात जेजेपीपीचा पुरता धुव्वा उडाला आहे. याऊलट या दोन्ही राज्यांत भाजपची दमदार कामगिरी झाली आहे. या दोन्ही राज्यात भाजपने कधिकाळी आघाडी केलेल्या मित्रपक्षांची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे या निकालामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवतो का?
हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. भाजपने जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. पण त्यानंतर त्यांनी पीडीपीचा हात सोडला होता. दुसरीकडे, हरियाणात त्यांनी जेजेपीला सोबत घेतले होते. पण विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजप प्रादेशिक पक्षांसोबत पुन्हा युती करून त्यांना संपवत चर्चा असल्याची एकदा राजकीय पटलावर रंगली आहे.