>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकीत उमेदवारीच्या घोषणेनंतर राजकीय ‘पक्षांतर पर्व’ सुरू झाले असून, नगराध्यक्षपदाचे तिकीट हे ‘आयाराम-गयाराम’ नेत्यांना दिलेला राजकीय पुरस्कार ठरले आहे. प्रमुख पक्षांनी केवळ वजनदार उमेदवारांनाच नव्हे, तर राजकीय सूड घेण्यासाठी बाहेर पडलेल्या नेतृत्वालाही तातडीने सामावून घेत, लढतींचा थरार वाढवला आहे.
भाजपने गमावले, राष्ट्रवादी-शिंदेसेनेने जिंकले
तुमसर-पवनी या दोन्ही पालिकांमध्ये तिकीट वाटपाने भाजपला मोठे खिंडार पडले.भाजपवर थेट आरोप करत बाहेर पडलेल्या कल्याणी भूरे यांना शिंदेसेनेने त्वरित तुमसरमधून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन भाजप नेतृत्वाला थेट आव्हान दिले. माजी शिक्षक आमदार यू. व्ही. डायगव्हाणे यांच्या कन्या असल्याने, हा केवळ एक उमेदवार नसून, एका मोठ्या राजकीय घराण्याला आपल्याकडे खेचण्याचा शिंदे-सेनेचा डाव मानला जात आहे.
गेल्या १० दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकणाऱ्या डॉ. विजया नंदूरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी पवनीतून उमेदवारी देऊन भाजपला दुसऱ्यांदा धक्का दिला. भाजपमधील अंतर्गत असंतोष थेट ‘राष्ट्रवादी’च्या पथ्यावर पडला आहे. त्यानंतर शिंदेसेना असा प्रवास करणाऱ्या माधुरी तलमले यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी संधी दिली आहे. पवनीत एकाच वेळी दोन्ही राष्ट्रवादी गटांनी ‘आयाराम’ नेतृत्वाला ताकद देत स्थानिक सत्ताकारण ढवळून काढले आहे.
वजनदार घराण्यातील ‘वारस’ मैदानात
आयारामांना संधी देत असतानाच, पक्षांनी जुन्या आणि वजनदार नेतृत्वाच्या ‘वारसां’वर विश्वास दाखवला आहे.
तुमसरचा ‘हाई-व्होल्टेज’ सामना: काँग्रेसने माजी आमदार अनिल बावणकर यांना स्वतः मैदानात उतरवले आहे. तर भाजपने, उमेदवारीवरून राजीनामा देण्याचा पवित्रा घेतलेल्या माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना पुन्हा तिकीट दिले. पडोळेंचा राजीनामा मागे घेऊन उमेदवारी देणं, हा त्यांच्या पक्षांतर्गत दबावाचा विजय मानला जात आहे.
भंडारा पालिकेत थेट ‘आमदार पत्नी’ विरुद्ध लढत
जिल्ह्याच्या मुख्यालयात शिंदेसेनेने आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉ. अश्विनी भोंडेकर यांना उतरवले आहे. ‘पतीच्या राजकीय ताकदीचा’ आधार घेत नगराध्यक्षपद जिंकण्याचा हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपने निष्ठावान नगरसेवक मिलिंद मदनकर यांच्या पत्नी मधुरा मदनकर यांना तर, काँग्रेसने महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांना उमेदवारी दिली आहे.
साकोलीत कापगते विरुद्ध कापगते
साकोलीत कापगते विरुद्ध कापगते असा पारंपरिक संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. भाजपने माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या स्नुषा देवश्री कापगते यांना तर, काँग्रेसने तालुकाध्यक्ष अशोक कापगते यांच्या पत्नी सुनीता कापगते यांना उमेदवारी दिली आहे. दोन प्रमुख राजकीय घराण्यांतील हा संघर्ष स्थानिक मतदारांना एका बाजूला वळायला लावेल.
या निवडणुकीत सर्वच पक्षांनी ‘डबल गेम’ खेळल्याचे स्पष्ट होते. एका बाजूला, पक्षांतर करणाऱ्या असंतुष्टांना तिकीट देऊन प्रतिस्पर्धी पक्षाची ताकद कमी करायची; तर दुसऱ्या बाजूला, भाजप, काँग्रेस, शिंदेसेनेने वजनदार नेत्यांच्या पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांना तिकीट देऊन त्यांचे पारंपरिक मतदार आणि स्थानिक यंत्रणा कायम ठेवायची, हेच धोरण दिसून येते. एकंदरीत, नगराध्यक्षपदाच्या या लढती नुसत्या निवडणुका नसून, आगामी काळात होणाऱ्या राजकीय बदलांची नांदी ठरतील, हे निश्चित.

