>>>भंडारा चौफेर | नागपूर प्रतिनिधी
देशाची राजधानी दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाविषयीचा सस्पेन्स संपेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे घडले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत गुरूवारी रात्री झालेल्या बैठकीत नेमके घडले काय ते समजू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे शहा यांच्याशी चर्चा केली.
हेही वाचा : मतपत्रिकेवर निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची स्वाक्षरी मोहीम
मात्र, त्या बैठकीनंतर कुणीच चर्चेची माहिती उघड केली नाही. त्याआधी शहांनी बुधवारी रात्री उशिरा भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी विस्तृत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास ४० मिनिटांपर्यंत चाललेल्या या बैठकीत विनोद तावडे यांनी शहा यांना महाराष्ट्रातील मराठा आंदोलनासंबंधी जो फिडबॅक दिला, तो फडणवीस यांच्या बाजूने नाही.यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचे नाव घोषित करण्यास विलंब होत आहे.
केंद्रीय निरीक्षक राज्यात येणार
दिल्लीतील बैठकीत घेण्यात आलेले निर्णय जाहीर करण्यात आले नाहीत. आता भाजपचे केंद्रीय निरीक्षक पुढील एक ते दोन दिवसांत मुंबईत येतील. ते भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करतील. पुन्हा महायुतीची बैठक होईल. त्यानंतर मुंबईतच मुख्यमंत्री निवडीची घोषणा होईल.नवे सरकार २ डिसेंबरपर्यंत स्थापन होईल, असे समजते.
मुख्यमंत्री कोण?
दिल्लीमध्ये महायुतीमधील तिन्ही घटकपक्षाच्या दिग्गज नेत्यांची केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक झाली. मुख्यमंत्रिपद भाजपलाच जाणार, हे निश्चित मानले जातेय. पण उदय सामंत यांनी शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडलाय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे निर्णय घेतील, तो मान्य असल्याचे म्हटले. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली. भाजपा नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार का? की देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार? भाजप राजस्थान आणि हरियाणासारखं धक्कातंत्र वापरणार? याची चर्चा सुरू आहे.