>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला असून रविवार दि.६ जुलै सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर पावसाचा वेग वाढून जिल्ह्यात ७ जुलै १०१.५० मिलिमीटर व ८ जुलै रोजी ११४.५० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक पर्जन्यवृष्टी लाखांदूर तालुक्यात झाली. वरठी महसूल मंडळ वगळता जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना ८ व ९ जून रोजी सुट्टी घोषित केले आहे. वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
जिल्ह्यात एकूण ७२ घरांचे अंशतः तर २ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ३७ मार्ग रहदारीसाठी बंद झाले आहेत. गोसेखुर्द धरणाचे ३३ गेट दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसामुळे रोवणी जोमात सुरू असून उकाड्यापासून सुटका झाल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले आहेत. पूर परिस्थितीचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज असले तरी मागील २ ते ३ दिवसापासून होणाऱ्या संततधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन अस्तव्यस्त झाले असले तरी जीवितहानी चे वृत्त नाही.
रोहिणी नक्षत्र कोरडा गेला, मृग नक्षत्रात पाऊस येईल. असे अपेक्षित असताना जवळपास मृगही कोरडा जाण्याचे स्थितीत असताना शेवटी व आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला असताना पुनर्वसु नक्षत्रास सुरुवात होताच ६ जुलै पासून जिल्ह्यात संततधार पावसाने सुरुवात झाल्याचा जनजीवनास फटका बसून जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली.
पूर परिस्थितीमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने शाळांना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली असून वैनगंगेचा जलस्तर सातत्याने वाढून पाण्याची पातळी २४५.२४ मीटर झाल्याने वैनगंगा नदीने इशारा पातळी गाठलेली आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे १.५० मीटर ने उघडण्यात आल्याने १०,०८०.३२ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे प्रशासनामार्फत नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वरठी महसूल मंडळ वगळता जिल्ह्यातील सर्वच ३८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांचेसह जिल्हा व पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून पूर परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे.
जिल्ह्यात ११४.५० मिलिमीटर पावसाची नोंद
जिल्ह्यात मागील ३ दिवसापासून संततधार पाऊस सुरू असून भंडारा ६९.४९ मिलिमीटर, पवनी १५५.१० मिलिमीटर, तुमसर १४७.६० मिलिमीटर, मोहाडी ९९.३० मिलिमीटर, साकोली ७५.२० मिलिमीटर, लाखनी ८३.६० मिलिमीटर, लाखांदूर १६४.७० मिलिमीटर अशी एकूण ११४.५० मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली असून सर्वात अधिक पाऊस सिहोरा, तालुका तुमसर २३१.५० मिलिमीटर तर सर्वाधिक लाखांदूर तालुक्यात १६४.७० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे ७४ घरांचे नुकसान
जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने ७४ घरांचे नुकसान झाले असून त्यात ७२ घरांचे अंशतः तर २ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. त्यात भंडारा तालुका २० अंशतः, पवनी तालुका १२ अंशतः, तुमसर तालुका ३२ अंशतः, मोहाडी तालुका ६ अंशतः – १ पूर्णतः, लाखांदूर २ अंशतः – १ पूर्णतः असे ७४ घरांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे.