पंचायत समिती लाखनीच्या सभापती व उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत कनेरी/दगडी पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या अश्विनी रुपवसंत मोहतुरे (कान्हेकर) यांची सभापतीपदी अविरोध निवड झाली.आरक्षण सोडतीत लाखनी पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचित जाती महिलेकरिता आरक्षित निघाले होते.
पंचायत समितीच्या विद्यमान १२ सदस्यांमध्ये कनेरी/दगडी पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या अश्विनी कान्हेकर या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून एकमेव सदस्य असल्याने त्यांची अविरोध सभापतीपदी वर्णी लागली. मात्र, उपसभापती पदासाठी चांगलीच रस्सीखेच झाली. उपसभापती पदासाठी एकुण चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, सुरेश झंझाडं यांचा अर्ज छाननीत रद्द झाला, अपक्ष पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे यांनी अर्ज मागे घेतला. शेवटी काँग्रेस कडून सुनिल बांते तर भाजपकडून शारदा मुकेश मते यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले.मतदानाद्वारे सुनिल बांते यांना सहा मते मिळाली, भाजपाच्या शारदा मते यांना ५ मते मिळाली तर एक पंचायत समिती सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे बहुमताने उपसभापतीपदी काँग्रेसचे सुनिल बांते यांची निवड झाली. एकंदरीत लाखनी पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
१२ सदस्यीय लाखनी पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक दोन टप्प्यात सन २०२१ व २०२२ मध्ये संपन्न झाली.यात काँग्रेसचे सुनील बांते,विकास वसानिक, प्रणाली सार्वे,मनीषा हलमारे,अश्विनी कान्हेकर,योगिता झलके असे एकुण सहा तर भाजपचे गिरीश बावनकुळे,सुरेश झंजाड, किशोर मडावी,शारदा मते, सविता राघोर्ते असे पाच व अपक्ष रवींद्र (दादू ) खोब्रागडे असे १२ सदस्य निवडून आले होते.
मे २०२२ मध्ये सभापती व उपसभापती पदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अंत्यत चूरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणाली सार्वे यांची सभापतीपदी तर, उपसभापतीपदी भाजपाच्या गिरीश बावनकुळे यांची ईश्वरचिठ्ठीने वर्णी लागली होती. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय महसूल अधिकारी अश्विनी मांजे यांनी काम पाहिले.यावेळी तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.