भंडारा चौफेर | भंडारा प्रतिनिधी
ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी शासनाच्या १५ वा वित्त आयोग व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध केला जातो. मात्र मागील काही महिन्यांपासून शासनाकडून या योजनां अंतर्गत निधी उपलब्ध न झाल्याने ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांना ब्रेक लागला असल्याचा आरोप केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, शासनाच्या १५ वा वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत दरवर्षी सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामे केली जातात. या विकास कामांमध्ये बंधित व अबंधित प्रकारच्या कामांचा समावेश आहे. तथापि, या कामांमध्ये १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत दरवर्षी सर्वच ग्रामपंचायतींना २ टप्प्यांमध्ये निधी उपलब्ध केला जातो.
यावर्षी मागील काही महिन्यांपूर्वी या आयोग अंतर्गत पहिल्या टप्प्याचा निधी उपलब्ध केला होता. त्याअंतर्गत सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रात नियोजनानुसार कमी अधिक प्रमाणात विविध विकास कामे केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र सुरू असलेले आर्थिक वर्ष संपण्याला केवळ काही दिवस शिल्लक असतांना देखील १५ व्या वित्त आयोगांतर्गत दुसऱ्या टप्प्या अंतर्गत विकास निधी उपलब्ध झाला नसल्याने ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामे रखडली असल्याचा आरोप केला जात आहे.
शासनाच्या मग्रारोहयो अंतर्गत दरवर्षी ग्रामपंचायत क्षेत्रात ६०:४० प्रमाणात विविध कुशल व अकुशल कामे केली जातात. अकुशल कामांतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातील मजुरांना विविध मजुरी काम उपलब्ध केले जाते तर कुशल कामांतर्गत विविध लाभार्थ्यांना व्यक्तिगतरीत्या पाळीव जनावरांचा गोठा, सिंचनासाठी विहिरीसह अन्य विविध योजनांचा लाभ दिला जातो.
ग्रामपंचायत क्षेत्रात ६०:४० प्रमाणाच्या आधारावर विविध सार्वजनिक विकास कामे केली जातात. मात्र मागील काही महिन्यांपूर्वीपासुन यावर्षीच्या रोहयोच्या कुशलकामांतर्गत मंजूर विविध विकास कामे थांबली आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास कामांना ब्रेक लागला असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दाखल घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी १५ वा वित्त आयोगा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील निधी उपलब्ध करण्यासह रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर कुशल कामांवर लावलेला ब्रेक हटविण्याची मागणी केली जात आहे.