>>>>संदीप नंदनवार | भंडारा चौफेर
जनसंघापासून उत्पत्ती झालेला भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांना जोपासणारा पक्ष म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत ख्यातीप्राप्त आहे. परंतु, आजच्या हायटेक जमान्यात सत्तेची दारे भाजपला सताड उघडी करण्यासाठी ज्या संघनिष्ठ निष्ठावंतांनी आपले पूर्ण आयुष्य खर्ची घातले त्यांची मात्र सत्तेच्या काळात नेहमीच उपेक्षा झाली आहे.
सलग तीनदा जिल्हा परिषदेचे सदस्यत्व प्राप्त करूनही केवळ केवळ कुणबी, तेली वा कोहळी जातीचा नसल्यामुळे सन २०१४ ला भाजपकडून विधानसभेची उमेदवारी नाकरण्यात आली, असा गौप्यस्फोट भाजप नेते तथा जि. प. भंडाराचे माजी अध्यक्ष ऍड. वसंत एंचिलवार यांनी एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना केला आहे.
क्रिकेटला सर्वाधिक अनिश्चिततेचा खेळ जे म्हणतात त्यांनी कदाचित राजकारणाचा खेळ जवळून पाहिला नसावा. पावलोपावली धक्के देणाऱ्या या खेळाचा डाव निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या नावाजलेल्या भंडारा जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूकप्रिय ग्रामीण जनतेला आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांची सुदोप सुंदी पाहावयास मिळत आहे. राजकारण म्हटले की, विविध राजकीय पक्ष आले आणि विविध राजकीय पक्ष म्हटले की, विविध मते आणि मतांतरे आली.
त्यामुळे लोकशाहीच्या राजकारणामध्ये मतभेद आणि आदर्शवाद गृहीत धरण्यात आलेले असले तरी या लोकशाहीच्या राजकारणाला जेव्हा कुरघोड्यांच्या राजकारणाचा वास येऊ लागतो तेव्हा मात्र ज्या सर्वसामान्य नागरिकांसाठी राजकारणातून समाजकारण करणाऱ्या निष्ठावंतांचे हित बाजूला पडले की काय? अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. असेही ऍड. एंचिलवार यांनी म्हटले आहे.
नेत्यांचे कुजके धोरण ठरले पक्ष संघटनेला बाधक
जनसंघाच्या काळात दोन आमदार देणारा साकोली, आमगाव व त्यानंतर १९८४, १९८९ व १९९४ मध्ये लाखांदूर, गोरेगांव, आमगाव, भंडारा, तिरोडा, साकोली या विधानसभा मतदारसंघातून ५ ते ६ आमदार आणि सन २०१४ पर्यंत भंडारा जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला होता.
परंतु, त्यानंतर भाजपचे काही जिल्हास्तरीय नेते विरोधी पक्ष नेत्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याने भाजपावर लोकसभेत जमानत जप्तीची नामुष्की आली. विशेष म्हणजे, विधानसभा मतदारसंघ २००८ च्या परिसींन आदेशानुसार पटोलेंना दोनदा साथ देणारा लाखांदूर मतदारसंघ गोठवण्यात आला. त्यामुळे ते तिसऱ्यांदा साकोली मतदारसंघातून मुंबई सर करण्याच्या तयारीत लागले.
तशी तिसरी विधानसभा जिंकण्याची त्यांची शाश्वती राहली नव्हती. मात्र, चाणाक्ष पटोले यांनी टेक्निकल मदत घेत लोकसभा अपक्ष लढले व पराभूत झाले. त्यानंतर पटोलेंनी भाजपाचे दार ठाठावले. भाजपातील वरिष्ठ नेत्यांनाही भंडारा जिल्हा नेतृत्वहीन वाटू लागला व याचाच फायदा घेत पटोले भाजपात दाखल झाले.
त्यामुळे नाना पटोलेच्या प्रवेशाने आमदार व दोन्ही जिल्हा परिषदा भाजपच्या वाट्याला आल्या खऱ्या, मात्र त्यानंतर नानाभाऊचे पक्षांतर व त्याला शरण गेलेल्या भाजप नेत्यांमुळे पुन्हा भाजप दोन्ही जिल्हयात लयाला गेली. आता भाजपला गतवैभव प्राप्त करण्यासाठी जून्या लोकांना विश्वासात घेण्याची गरज आहे. मात्र नागपूर वा वरून नेतृत्व लादण्याची प्रथा भाजपला मोडावी लागेल.
त्यातही परंपरागत साकोली, आमगाव, अर्जुनी (मोर.) हे काँग्रेसच्या घशात गेलेले आमदार निवडून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. एकंदरीत नेत्यांचे कुजके धोरण ठरले पक्ष संघटनेला बाधक ठरले असल्याची खंतही अॅड एंचिलवार यांनी आपल्या मुलाखतीतून व्यक्त केली.
लाखांदूर तालुक्याला प्रतिनिधित्व मिळाल्यास समीकरण बदलू शकते
नानाभाऊसारख्या प्रबळ व्यक्तीला पराभूत करण्यासाठी ३० वर्षापासून लाखांदूर तालुक्याला प्रतिनिधित्व न मिळालेल्या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यास समीकरण बदलू शकते. त्यादृष्टीने ॲड.वसंत एंचीलवार जे तीनदा जि.प.सदस्य, अध्यक्ष यांना भाजप आणि संघाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. नानाभाऊला त्यांनीच सन २००० – २००५ मध्ये जि. प. आणि पं. स. मध्ये पाणी पाजले होते व त्यामुळे साकोली विधानसभा निवडणुकीत चुरस दिसेल.
अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा नवा फंडा आणला जात आहे. सन 2000 च्या पूर्वी नामदेवराव दिवटे, लक्ष्मणराव मानकर, शामरावबापू कापगते, मुरलीधर नंदनवार, हरिभाऊ तुपटे, भिवाजी दिवटे हे असे व्यक्तिमत्व होते की आपण निवडणूक हरणार म्हणून माहीत असतानाही निवडणुका लढणे हाच त्यांचा ध्यास होता.
भाजपासाठी निष्ठावंत म्हणून वारंवार निवडणुका लढणे व पराभूत होणे या कृतीपायी नामदेवराव दिवटे यांनी सहा वेळा विधानसभा लढली. यात ते चार वेळा पराभूत तर दोनदा आमदार व त्यानंतर चिमूरचे दोनदा खासदार झाले. त्या काळात इलेक्टिव्ह मेरिट नव्हते व जातीपातीचाही आधार घेतला जात नव्हता.
मात्र, अलीकडच्या काळात पूर्व विदर्भात फक्त भंडारा जिल्ह्यासाठी जातीपातीचा आधार इलेक्टिव्ह मेरिट म्हणून घेतला जातो. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाला गतवैभव मिळवून देणारे मानकर गुरुजी, दिवटे साहेब, मुरलीधर नंदनवार सावकार साहेब यांच्या जनसंघापासूनच्या परिश्रमाला मूठमाती देण्याचे काम काही आयारामांनी केले आहे. पटोलेंसारख्या नेत्यांना भाजपा कधीच कळली नाही अशा लोकांच्या हाती जिल्ह्यातील भाजपाची सूत्रे सोपवून भाजपाला धनशक्ती व जातीच्या आधारावर रसातळाला नेत असल्याची खंत मनाला वाटते.
ऍड वसंत एंचिलवार
भाजपा नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष भंडारा

