>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
साकोली विधानसभा मतदारसंघाने काँग्रेस व भाजपाला आतापर्यंत समसमान कौल दिला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान आमदार नाना पटोले यांनाच उमेदवारी मिळून त्यांच्या विरोधात महायुतीच्या भाजपचे माजी आमदार बाळा (राजेश) काशीवार किंवा डॉ. सोमदत्त करंजेकर हे निवडणूक रिंगणात दिसतील, असे संकेत आहेत.
परंतु आता महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून इच्छुकांच्या यादीत जि. प. सदस्य अविनाश ब्राम्हणकर यांचे नाव समोर आले आहे. याखेरीज आरपीआय व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील विधानसभेच्या आखाड्यात दिसतील. दरम्यान, उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी ‘दुसऱ्या पक्षात जायची वेळ आली तरी चालेल परंतू यंदा थांबायचंच नाही’ अशी पक्की खूणगाठ इच्छुकांनी मनाशी मारलेली दिसत आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खा. प्रशांत पडोळे यांना मतदारसंघातून सुमारे २७ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अपेक्षा उंचावल्या. युतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला आहे. असे असले तरी भाजपसह राष्ट्रवादीनेही मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. अर्थात भाजप नेते इतके सहजपणे ही जागा इतर कुणासाठीही सोडतील, असे वाटत नाही.
ही जागा भाजपच्या कोट्यात असल्याने भाजपकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात माजी आमदार बाळा (राजेश) काशीवार यांचे नाव अग्रक्रमावर आहे. आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या विविध लोकोपयोगी विकासकामांमुळे ते मतदारसंघातील प्रत्येक गावात परिचीत आहेत.
तर अलिकडेच भाजपकडून डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांसाठी ते विविध उपक्रम व योजना राबवताना दिसत आहेत. त्यांना वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याने त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांच्या एंट्रीने युतीच्या इतर इच्छुकांची मात्र धाकधूक वाढली आहे.
तर, इतरही इच्छुकांनी एकला चलो रे चा नारा देत मतदारांशी जनसंपर्क साधण्यावर भर देत विविध कार्यक्रमांत त्यांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय केली आहे. त्यामुळे आता महायुती साकोलीत पटोलेंच्या विरोधात कुठला उमेदवार देणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. एकंदर इच्छुकांप्रमाणेच विविध समस्या आणि प्रश्नांची भाऊगर्दी असलेला साकोली मतदारसंघ सध्या राजकिय दृष्टया जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरू लागला आहे.

