भंडारा चौफेर प्रतिनिधी | पवनी विधानसभा मतदार संघात भाजप आणि काँग्रेस परंपरागत विरोधक आहेत. भंडारा विधानसभा मतदारसंघात राजकीय हवा नेहमीच बदलत राहाते. येथे एखाद्याला ठरवून पाडले जाते आणि दुसऱ्याला विजयी केले जाते. मागील निवडणुकीत अपक्ष असतानाही मतदारांनी भोंडेकर यांना डोक्यावर घेतले होते.
हेही वाचा : दिवाळीनंतर विधानसभेचा धुरळा उडणार ? नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता, डिसेंबर महिन्यात मतदान
पंतप्रधान मोदी यांची लाट असतानाही ते स्वबळावर निवडून आले होते. आता मात्र अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपच अडचणीत आली आहे.विधानसभा जागा वाटपात महविकास आघाडी आणि महायुतीत सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. आजवर लढत असलेल्या जागा सोडण्याची वेळ यामुळे अनेकांवर येणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या मतदारसंघावर दावा केला असून आणखी एका नरेंद्रला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसलासुद्धा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यात, एक जागा सोडावी लागणार आहे. भंडारा मतदार संघात कोणालाच कोणाची शाश्वती देता येत नाही. इथं उमेदवाराला ठरवून पाडले जातात. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणाचीही लॉटरी लागते, याकडे लक्ष लागलं आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडी दीडशे पार ? भाजपची झोप उडवणारा सर्व्हे!
हा इतिहास बघता या वेळी भंडाऱ्यातील मतदार कोणाला पाडणार, याचीच अधिक चर्चा येथे रंगलीय काँग्रेस आणि भाजपासारखे पक्षाचे उमेदवार मैदानात असताना 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी दोघांनाही पराभूत केले होते.
भोंडेकर मूळचे शिवसैनिक आहेत. भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपने ही जागा आपल्या ताब्यात घेतली. त्यावेळी जोगेंद्र कवाडे काँग्रेससोबत होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे लढले होते. भाजपने अरविंद बालपांडे यांना उमेदवारी दिली होती. बालपांडे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली, तर कवाडे यांना 20 हजार मतांचाही आकाडा गाठता आला नव्हता.
दोन नरेंद्रांनमध्ये रंगणार ‘सामना’?
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ते परत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जातील, असे सर्वांना वाटत होते. मात्र त्यांनी सबुरीचे धोरण अवलंबले. महायुतीचे सरकार आल्यानंतर मात्र ते उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला.
हेही वाचा : …ते फर्मान सोडणारा तो ‘कटप्पा’ कोण?
आता या जागेवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने दावा ठोकला आहे. जागा वाटपाचा निर्णय अद्याप अंतिम झाला नसताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने नरेंद्र पहाडे यांचे नाव रेटून धरले आहे. हे बघता येथे नरेंद्र विरुद्ध नरेंद्र, असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

