>>>चौफेर प्रतिनिधी | भंडारा
जिल्ह्यात आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भंडारा तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या विद्यमान अध्यक्षा स्वाती हेडाऊ यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, पक्षाच्या कार्यप्रणालीवर असलेली नाराजी व महिला कार्यकारिणीकडे वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष हे स्वाती हेडाऊ यांच्या राजीनाम्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. भंडारा तालुक्यातील काँग्रेसच्या राजकीय गोटात गेल्या काही काळापासून नाराजीचे सूर उमटत होते. या पाश्वभूमीवर या राजीनाम्याने पक्षातील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उलथापालथ
जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असताना, हेडाऊ यांचा राजीनामा पक्षासाठी धक्कादायक ठरत आहे. तालुका महिला काँग्रेसच्या नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हेडाऊ यांच्या पावलामुळे काँग्रेसच्या महिला मतदार आणि कार्यकर्त्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या निर्णयाने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना जन्म देण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण
या राजीनाम्याने भंडारा तालुक्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते, हा राजीनामा काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा परिणाम आहे, तर काहींचा अंदाज आहे की स्वाती हेडाऊ नव्या राजकीय समीकरणांच्या दिशेने वाटचाल करू शकतात. निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.या घडामोडींचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

