>>>>संदीप नंदनवार | भंडारा चौफेर
भंडारा जिल्हा हा कालपरवापर्यंत भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता. तो पाडण्यासाठी यापूर्वी काँग्रेसने जंग जंग पछाडले होते. मात्र, त्यांना यश येत नव्हते. गत लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाचा हा बालेकिल्ला प्रथमच ढासळला. महाविकास आघाडीचे शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्याचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ कामाला आले.
हेही वाचा : योजनेच्या लाभासाठी पिंपळगावच्या सरपंच बनल्या आजीबाई
भाजपावर असलेले संघनिष्ठ लोकांचे प्रेम आणि सहानुभूती या लढतीतही मोठ्या प्रमाणावर दिसली. पण भाजपाला हा बालेकिल्ला गमवावा लागला. त्याची अनेक कारणे सांगता येतील. पण सर्वाधिक महत्त्वाचे हेही कारण आहे, की मेंढे – फुके यांच्या वर्चस्ववादाच्या लढाईत गटागटात विखुरलेल्या भाजपाकडे भंडारा जिल्ह्यात खमक्या सेनापती राहिलेला नाही. जिंकत आलेल्या एखाद्या क्रिकेटच्या मॅचलाही उत्तम ‘फिनिशर’ असावा लागतो. अन्यथा ती मॅच शेवटच्या क्षणी हातातून निसटते. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या बाबतीत नेमके हेच झाले.
हेही वाचा : साकोली विधानसभा : महायुतीचा उमेदवार कोण? जोरदार रस्सीखेच
याआधी भाजपाकडे लक्ष्मणराव मानकर, श्यामरावबापू कापगते, नामदेवराव दिवटे, राम आस्वले, हेमकृष्ण कापगते, मुरलीधर नंदनवार, हरिभाऊ तुपटे, दयाराम कापगते व गोविंद निंबेकर यांच्यासारखे जिंकून देणारे ‘फिनिशर’ उपलब्ध होते. आता त्यांची उणीव आहे. ती भरून काढण्याची जबाबदारी भाजपाला आगामी काळात पार पाडावी लागेल. अन्यथा निवडणुका फक्त रंगतदार होतील आणि निकालाच्या नावाने… जय श्रीराम !!
विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. निवडणुक लोकसभेची असली, तरी त्या निवडणुकीतील आमदारांची कामगिरी ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार होती. आपल्या आघाडी व युतीच्या उमेदवारासाठी या निवडणुकीत आमदारांनी मारलेल्या जोर- बैठकांचा तपशील आता लोकांसमोर आहे. गेल्या चार महिन्यांत त्यावर बरीच चर्चाही घडून गेली आहे.
हेही वाचा : आमचे ठरले!भंडारा पवनी विधानसभा आता आमची : माजी खा.मधुकर कुकडे
सन २०१४ ला भंडारा, तुमसर व साकोली या तिन्ही विधानसभा मतदारसंघासह भंडारा लोकसभेवर निर्विवाद वर्चस्व मिळविलेला भारतीय जनता पार्टीचा ढासळलेला बालेकिल्ला हे या लोकसभेचे भंडारा जिल्ह्याच्या दृष्टीने वैशिष्ट्य ठरले आहे. संघ विचारांचा मानला गेलेला हा मतदारसंघ अखेर महाविकास आघाडीच्या जोरावर काँग्रेसने ताब्यात घेतला. आता यानंतर विधानसभेला जिल्हा कोणती दिशा धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास लोकसभेत काय झाले, हे दुर्लक्षून चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत तयार झालेले काही अंडर करंट विधानसभा निवडणुकीसाठी परिणामकारक ठरणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने मताधिक्य घेतले.
हेही वाचा : विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता ?
महायुतीचे दोन, तर महाविकास आघाडीचा एक आमदार असे पक्षीय बलाबल त्या वेळी होते आणि अजूनही आहे. लोकसभा निवडणुकीतील या तिन्हीही आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करायचे झाल्यास महायुतीचे दोन आमदार आपल्या लोकसभा उमेदवाराला मताधिक्य देऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती असून, आगामी विधानसभेसाठी ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीतील या आमदारांच्या कामगिरीवरच आगामी विधानसभेची गणिते अवलंबून राहणार आहेत.
महायुतीच्या आमदारांना आपल्या उमेदवाराला मताधिक्य देता आलेले नाही, याचा अर्थ या आमदारांच्या ताकदीचा भ्रम मतदारांनी दूर केला आहे, असाही लावता येईल. आम्ही ज्या बाजूने उभे राहू, त्या उमेदवाराला मताधिक्य मिळेल, ही आमदारांची समजूत फोल ठरवून मतदारांनी आपली स्वतंत्र वैचारिक ताकद दाखवून दिली आहे, असेही म्हणता येईल. या दृष्टीने सर्वच आमदारांचा लोकसभेतील लेखाजोखा पाहणं रंजक ठरेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास जवळचे, विकासपुरूषाचे बिरुद मिरवत विकासकामांचा आणि कार्यक्रमांचा प्रचंड बोलबाला करूनही भंडारा – पवनीमध्ये नरेंद्र भोंडेकर यांना आपल्या लोकसभा उमेदवाराला मताधिक्य देता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. साकोलीने तर यावेळी युतीचा सर्वांत मोठा भ्रमनिरास केला. सुनिल मेंढे यांना ५० ते ६० हजारांचे मताधिक्य देण्याची घोषणा करणारे माजी पालकमंत्री आपल्या उमेदवाराला मताधिक्य देऊ शकले नाहीत.
युतीच्या सत्ताकाळात पालकमंत्री असलेल्या नेत्याची ताकद असलेला मतदारसंघ म्हणून साकोलीची ओळख आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला २७ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. केवळ दौरे, जनता दरबार व एकाधिकारशाहीच्या नावावर घरबसल्या मते मिळवू, हा आत्मविश्वास तेथे कोलमडून पडला.
हेही वाचा : माजी नगराध्यक्षाच्या बनावट साक्षऱ्या करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!
लोक वेगळ्या विचाराने चाललेत, हे तिथे लक्षातच घेतले गेले नाही.राष्ट्रवादीचा गड असलेल्या तुमसर – मोहाडीत महायुतीचा उमेदवाराला मताधिक्याची खात्री होती. पण ते जनतेच्या पसंतीला उतरले नाहीत, हे तेथील निकालावरून स्पष्ट झाले. अखेरच्या टप्प्यात आगामी विधानसभेची ऑफर मिळताच तुमसरचे विद्यमान आमदार झपाट्याने कामाला लागले. पण त्यांची भूमिका मतदारांना रुचली नाही.
एक हाती ताकद असतानाही ते महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देऊ शकले नाहीत. तीन पक्षांच्या मनोमिलन फॅक्टरमुळे महायुतीच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली.भंडारा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व साकोली या मतदारसंघांत महायुतीची कामगिरी आत्मचिंतन करावे, अशीच झाली आहे.
साकोलीमध्ये भाजपाने सर्व प्रयत्न करूनही माजी पालकमंत्री लोकसभेच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यात अपयशी ठरले आहेत. आताही विधानसभेसाठी काही एकत्रित निर्णय घेतला गेला, तरच तिथे भाजपाच्या हाती काही लागू शकते; अन्यथा पहिले पाढे पंचावन्न, असेच म्हणावे लागेल. भंडारा-पवनीमध्ये नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीतूनच अंतर्गत तीव्र विरोध आहे. महायुतीला तेथेही विचारपूर्वक लढाई करावी लागणार आहे.
तर तुमसर मध्ये महायुतीतील घटक पक्षांचा ताळमेळच जमला नाही. दरम्यान, या तिन्ही मतदारसंघांचे लोकसभेचे हे विवेचन पाहिले असता, एक गोष्ट लक्षात येते, की आमदार बरोबर आहे म्हणून तेथील मते आपल्याला पडणारच या भ्रमात महायुतीने राहण्याचे दिवस आता संपले आहेत. लोक विचारपूर्वक लोकप्रतिनिधी निवडत आहेत. एकास एक समोरासमोर लढती झाल्यास वेगळे निकाल पाहायला मिळतील, हे विसरता कामा नये.
त्यामुळे जे लोकसभेला झाले, तेच विधानसभेला होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. अर्थात, विधानसभा निवडणूक ही पूर्णतः वेगळी असते, तिचे परिमाण वेगळे असतात, हे जरी मान्य केले, तरी हे महायुतीने लक्षात घ्यायला हवे, हे मात्र निश्चित.