>>>>>रवी भोंगाने
सध्या गणेशोत्सव पर्व सुरू आहे. पर्व हा शब्द वाचून दचकण्याचे कारण नाही. कारण कुणाचा केव्हाही पर्व चालू होतो. या गणेश उत्सव पर्वात अलीकडेच फलकावर जि.प.सदस्य अविनाश ब्राह्मणकर अवतरले आहेत. त्यामुळे ब्राह्मणकर हे कोणत्या दिशेने पाऊल टाकणार याची चर्चा सुरू झालेली आहे.
साकोली विधानसभा निवडणुकीचे सिंहावलोकन करतांना मागील अंकात अविनाश ब्राह्मणकर यांचा उल्लेख करण्यात आला होता.भाजप-शिंदे आणि अजित पवार गट यातून नानाभाऊंच्या विरोधात कुणबी उमेदवार उभा करायचा असेल तर स्थानिक विधानसभा क्षेत्रातील अविनाश ब्राह्मणकर हे राष्ट्रवादी (अजित पवार) गटातून सक्षम उमेदवार राहू शकतात.अविनाश ब्राह्मणकर हे दोनदा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत.एकदा ते पंचायत समिती सदस्य देखील राहिलेले आहेत.
साकोली विधानसभेतील जिल्हा परिषद सदस्य यांचा राजकीय आढावा घेतला तर साकोली विधानसभा क्षेत्रात आ.नाना पटोले, माजी आमदार बाळा काशीवार आणि सेवक वाघाये आहेत हे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि त्यानंतर ते आमदारही झालेले आहेत.
सध्या साकोली विधानसभा क्षेत्राचा विचार केला असता काल-परवापर्यंत कुठेही फलकावर न दिसणारे अविनाश ब्राह्मणकर अचानक शासन जाहिरातीच्या माध्यमातून फलकावर अवतरले. सध्या साकोली विधानसभा क्षेत्रात लागलेले त्यांच्या फलकांनी ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
यापूर्वी अविनाश ब्राह्मणकर साखरा पंचायत समिती सदस्य, सानगडी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत.या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करून ते लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी ) येथील जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधित्व सध्या करीत आहेत.
ब्राह्मणकर यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी,भाजप आणि राष्ट्रवादी ( सध्या अजित पवार गट ) असा राहिलेला आहे. कधीकाळी ते भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. अविनाश ब्राह्मणकर हे भाईजी आणि सुनील फुंडे यांचे विश्वासू समजले जातात. विधानसभेच्या दोन निवडणुकापूर्वी भाईजी यांनी नानाभाऊंच्या विरोधात ब्राह्मणकर यांच्या रूपात शाब्दिक तोफ उभी केली होती.
त्यावेळी ” कहा रुपय्या कहा चव्वणी “असे ब्राह्मणकर यांच्या शाब्दिक तोफेतून गोळे निघत होते. कालांतराने या तोफेचे तुकडे झाले आणि या तुकड्यांची अवस्था नंतर एक यहा गिरा,दुसरा वहा गिरा अशी झाली. त्यानंतर ब्राह्मणकर यांनी सत्तेची हवा बघून भाजप पक्षाचे राजकीय मंगळसूत्र गळ्यात घालून राष्ट्रवादीशी काडीमोड घेतला.
ब्राह्मणकर यांनी भाजपशी नवा घरोबा तर केला पण त्यांना भाजपशी जुळवून घेता आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत येऊन “तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना ” असं म्हणून राष्ट्रवादी पक्षाशी घेतलेला राजकीय घटस्फोट रद्द केला.
असे असतांना अचानक महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण, मोफत तीन सिलेंडर, मोफत मुलींना शिक्षण आणि तरुणांना मोफत प्रशिक्षण या योजनेच्या प्रचारातून साकोली विधानसभा क्षेत्रात अविनाश ब्राम्हणकर फलकावर झळकू लागलेले आहेत.
सध्या गणेशोत्सव सुरू आहे.जर निवडणुकीची तारीख घोषित झाली नाही तर पुन्हा नवरात्र आणि दसरा याही निमित्ताने विविध पक्षांचे चेहरे फलकाच्या रूपात विविध ठिकाणी दिसून येतील.सध्या तरी अविनाश ब्राह्मणकर अचानक फलकावर अवतरल्याने ब्राह्मणकर अवतरले फलकावर अशी चर्चा साकोली विधानसभा क्षेत्रात सुरू झाली आहे.

