लाखनी : कोणत्यातरी वादातून तरूणावर एका धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना तालुक्यातील मुरमाडी/सावरी येथील उज्वलनगर परिसरातील नहराजवळ दि.४ मार्च रोज मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यात शुभम टांगले वय (२७) रा. उज्वलनगर मुरमाडी/सावरी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी जखमीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून,रोहित विष्णू देशमुख(वय २५ वर्षे,रा.बालाजीनगर केसलवाडा/वाघ,ता.लाखनी) असे आरोपीचे नाव आहे.
या घटनेतील जखमीचे आई-वडील घटनेच्या दिवशी घराच्या मागच्या बाजूला घरकाम करीत होते.या दरम्यान जखमी आपल्या बहिणीसोबत घरातील एका खोलीत टीव्ही बघत होता. दरम्यान ९ वाजताच्या सुमारास अचानकपणे मुलीचा जोर-जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने आई-वडील घराबाहेर निघाले. यावेळी मुलगी ही घरालगत नहराजवळ रडतांनी दिसून आली.
याबाबत मुलीला विचारणा केली असता,मुलीने सांगितले कि,टीव्ही बघत असतांनी शुभमच्या मोबाईलवर एका अज्ञात इसमाचा फोन आला होता.यावेळी बोलत बोलत शुभम नहराकडे निघून गेला. काही वेळाने या घटनेतील आरोपी रोहित देशमुख घरी आला व तुझ्या भावाला धडा शिकवायचा आहे त्याला सांभाळून ठेव असे बोलुन निघून गेला. त्याच्यामागे जखमीची बहीण गेली असता, नहराजवळ जितु देशमुख शुभमला पकडून होता व शुभम जखमी अवस्थेत रक्तबंबाळ होऊन दिसून आला.
यावेळी जितू देशमुख या तरुणाने सांगितले कि,आरोपी रोहित देशमुख याने शुभमच्या गळ्यावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. अडवण्याचा प्रयत्न केला मात्र, आरोपीने ऐकले नाही व पळून गेला.शुभमच्या गळ्यावर जखम असल्याने त्याला बोलता येत नव्हते. त्यामुळे बहीण प्राजक्ता व जितू यांनी शुभमला प्राथमिक उपचारासाठी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी वडील प्रमोद सदाशिव टांगले(वय ५३) यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी कलम १०९,(१) भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आला असून, या घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली आहे.पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.