भंडारा | प्रस्थापित पक्षांकडून कायमच ‘व्होट बँक’ म्हणून वापरल्या जाणाऱ्या आंबेडकरवादी विचारांच्या पक्षांनी तसेच संघटनांनी भंडारा जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दमदार एंट्री घेतली आहे. फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांवर काम करणाऱ्या प्रमुख पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी एकत्र येत ‘भंडारा जिल्हा आंबेडकराईट ‘नगर विकास आघाडी’ ची स्थापना केली आहे. हा राजकीय ‘प्रयोग’ भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवण्याची शक्यता आहे.
‘वंचित’ सह अनेक पक्ष, संघटनांचा समावेश
या नव्याने स्थापन झालेल्या आघाडीत वंचित बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, आझाद समाज पार्टी, रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट वगळता) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेष म्हणजे, यासोबतच भीम आर्मी, समता सैनिक दल, एकलव्य सेना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटन यांसारख्या सामाजिक संघटनांनीही या आघाडीला पाठिंबा देत, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे.
या, चारही नगरपरिषदेत लढणार!
या आघाडीने भंडारा जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा भंडारा, साकोली, तुमसर आणि पवनी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने आंबेडकरवादी विचारांच्या मतदारांना एक प्रबळ पर्याय उपलब्ध होणार असून, प्रस्थापितांची डोकेदुखी वाढणार आहे.आघाडीच्या पुढील वाटचालीसाठी बैठकांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, भंडारा: 7 नोव्हेंबर, साकोली: 8 नोव्हेंबर, पवनी: 9 नोव्हेंबर, तुमसर: 10 नोव्हेंबर असे आहे. विशेष म्हणजे, या बैठकित बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारीही उपस्थित होते. या आघाडीबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे बसपासुद्धा या आघाडीत सामील होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

