>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच, साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रात ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नीलेश कदम आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश वासेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
हेही वाचा | ‘वेट अँड वॉच’ची रणनीती; निवडणुकीत ‘बंडखोरी’चा बार उडणार?
थेट नगराध्यक्ष निवड; २० सदस्य रिंगणात
साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १० प्रभागांमधून २० सदस्य निवडले जाणार आहेत. यावेळी नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेमधून केली जाणार असल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
मतदार आणि निवडणुकीचे वेळापत्रक
-एकूण मतदार : २२ हजार ६८१
-नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची सुरुवात: १० नोव्हेंबर
-नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत: १७ नोव्हेंबर
-छाननी: १८ नोव्हेंबर
-माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर
-माघारीची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर
आचारसंहितेची कडक अंमलबजावणी
निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता प्रभावी राहणार आहे. आयोगाने याच्या अंमलबजावणीबाबत कडक निर्देश दिले आहेत. प्रशासकीय यंत्रणा आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी ‘वॉच’ ठेवून आहे. मतदान सुरू होण्याच्या २४ तास आधी, म्हणजेच ३० नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून प्रचारबंदी लागू होईल.
हेही वाचा | पोस्टर’राज संपले, शहरातील अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स हटले
यानंतर कोणत्याही प्रकारच्या सभा, मोर्चे आयोजित करता येणार नाहीत, तसेच ध्वनीक्षेपकाचा (लाउडस्पीकर) वापर पूर्णपणे बंद राहील. जाहिराती, प्रसारण आणि प्रचारात्मक उपक्रमांवरही पूर्णपणे बंदी असेल. प्रशासनाच्या सज्जतेमुळे साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार हे मात्र निश्चित.

