>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अगदी 208 मतांनी निसटता विजय झाला. एका बाजूला काँग्रेसचे दिग्गज नेते, प्रदेशाध्यक्ष व भावी मुख्यमंत्र्याच्या चेहरा म्हणून, ओळख निर्माण करणारे नाना पटोले तर दुसरीकडे महायुतीकडून जिल्हा परिषद सदस्य असलेले अविनाश ब्राह्मणकर यांच्यात मुख्य लढत झाली.
दरम्यान, काँग्रेसचे नाना पटोले हे हजारोच्या मताधिक्याने निवडून येतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या फेरी पर्यंत अत्यंत रंगतदार ठरलेल्या मतमोजणीत नांनाचा केवळ 208 मतांनी विजय झाला.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत नाना पटोले यांनी बाजी मारली आहे.
मात्र, साकोली विधानसभा मतदारसंघात पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचे “जनतेच्या मनातील आमदार” असा आशयाचे बॅनर झळकले आहे. यामुळे साकोली विधानसभा मतदारसंघात या बॅनरची खमंग चर्चा रंगली आहे. निकालाअंती केवळ 208 मतांचा अंतर आल्याने महायुतीच्या अविनाश ब्राह्मणकर यांची जनतेच्या मनात आमदार म्हणून छवी निर्माण झाल्याचे एकंदरीत दिसून येते.
साकोली विधानसभेत साकोली, लाखनी व लाखांदूर हे तीन तालुक्यांचा समावेश असला तरी विशेष म्हणजे मागील 25 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत लाखांदूर हे नाना पटोले यांच्या विविध राजकीय स्थित्यंतराचे केंद्र ठरले आहे. नानांनी देखील लाखांदूर तालुक्याला कर्मभूमीच मानले आहे.
अविनाश ब्राह्मणकर यांनी नाना पाटोले यांना ईव्हीएमच्या मतमोजणीत पराभूत केल्याने जनतेच्या मनामनात ब्राह्मणकर यांना वेगळे स्थान मिळाळे आहे. त्यामुळेच ब्राह्मणकर पराभूत झाले असले तरी त्यांच्या चाहत्यांनी “जनतेच्या मनातील आमदार” अशा आशयाचे बॅनर साकोली विधानसभा क्षेत्रात लावले आहेत. हे बॅनर सध्या साकोली विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे.

