चौफेर प्रतिनिधी मुंबई | राज्यातील बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे. त्या निवडणुकीचे वेळापत्रक चालू महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या प्रारंभी जाहीर केले जाऊ शकते. साहजिकच, राज्यातील राजकीय रणसंग्राम सुरू होण्यास फार अवधी उरलेला नाही. त्यामुळे महायुती आणि विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीच्या गोटांमध्ये आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
दरम्यान, आता महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. लवकरच त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांकडून नमूद करण्यात आले. महायुतीमधील समझोत्यानुसार, भाजप १४० ते १५० या दरम्यान जागा लढवेल.
त्याखालोखाल वाटा शिंदेसेनेला मिळेल. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ महायुतीच्या जागावाटपाचे सुत्र जवळपास निश्चित झाल्याचे समजते. त्यानुसार, महायुतीमधील सर्वांत मोठा घटक पक्ष या नात्याने भाजप एकूण २८८ पैकी निम्म्या जागा लढवण्याची शक्यता आहे.
तो पक्ष किमान १४० जागा लढवेल. तर, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला ८० जागा येण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाट्याला सर्वांत कमी जागा येतील. तो गट ६० पेक्षा कमी जागा लढवेल, असे वृत्त एका वाहिनीने महायुतीमधील सूत्रांच्या हवाल्याने दिले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची राज्यात पीछेहाट झाली. त्यामागे जागावाटप आणि उमेदवार निवडीतील विलंब हेही एक कारण असल्याचे मानले जाते. ती बाब विचारात घेऊन महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप लवकरात लवकर निश्चित करण्याची लगबग सुरू केली. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटाच्या तुलनेत शिंदेसेनेची कामगिरी उजवी ठरली.
त्यामुळे शिंदेसेनेच्या वाट्याला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा येणार असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी झाल्याने अजित पवार गटाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. त्या गटानेही आग्रही भूमिका न घेता कमी जागांवर समाधान मानण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. त्या गटाच्या वाट्याला ५५ च्या आसपास जागा येऊ शकतात. महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्ष इतर छोट्या मित्रपक्षांनाही सामावून घेणार आहेत. त्या छोट्या पक्षांना किमान ३ जागा दिल्या जाऊ शकतात.
मैत्रीपूर्ण लढतींच्या प्रस्तावाचा इन्कार
काही जागा नेमक्या कुणी लढवायच्या यावरून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव जागावाटप बोलणीवेळी मांडण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र, तसा कुठला प्रस्ताव पुढे आल्याचा स्पष्ट इन्कार भाजपच्या गोटातून करण्यात आला. तसेच, उमेदवाराची जिंकण्याची क्षमता या एकाच निकषावर जागावाटप होणार असल्याचेही सांगण्यात आले.