>>> भंडारा चौफेर : प्रतिनिधी
लाखनी : दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालले असून, तालुक्यातील मानेगाव ते पालांदूर मार्गावरील पोहरा येथे तीन अज्ञात इसमांनी एका फळविक्रेत्या महिलेला भरदिवसा चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना (दि.26) ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास समोर आली आहे. वंदना शंकर दिघोरे वय (47) रा. पोहरा असे फळविक्रेत्या पीडित महिलेचे नाव आहे.
या घटनेतील पीडित महिला आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी पोहरा ते पेंढरी रोड परिसरात रस्त्यालगत फळविक्रीचा व्यवसाय करतो. दरम्यान, शनिवारी परिसरात कुणी नसल्याची संधी साधून तीन अज्ञात इसमांनी भरदिवसा चाकुचा धाक दाखवीत बळजबरीने तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व नगद रोख रक्कम असा एकूण 32 हजरांचा मुद्देमाल लंपास केला. व तिघेही आरोपी स्कूटीने मानेगावच्या दिशेने पसार झाले.
विशेष म्हणजे, चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्यामुळे परिसरतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चोरांचे धाडस वाढल्याचे दिसून येत असून, त्यांना गजाआड करण्याचे आव्हान लाखनी पोलिसांसमोर आहे.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांत तिन्ही अज्ञात आरोपीतांवर कलम 309 (4) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे करीत आहेत.