>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
शेतकरी कर्जमुक्ती आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये धडकणाऱ्या महाएल्गार मोर्चाने राज्य सरकारला खडा इशारा दिला आहे. “मागण्या पूर्ण होईपर्यंत ही आरपारची लढाई!” असा निर्धार प्रहार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, जिल्ह्यातूनच हजारो कार्यकर्ते सात दिवसांचा शिधा (राशन) घेऊन मोर्चासाठी रवाना झाले आहेत. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत असल्याने सरकारवर दबाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
बच्चू कडू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मागण्या पूर्ण करून घेऊ. सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करू. असा इशारा देत, प्रहारचे हे कार्यकर्ते ट्रक, बस आणि खाजगी वाहनांनी नागपूरकडे कूच करत असून, मोर्चाच्या ठिकाणी तंबू उभारून दीर्घकाळ ठिय्या देण्याची तयारीत दिसून येत आहेत.
मुख्य मागण्या काय?
– विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा पूर्ण बोजा माफ.
– दिव्यांगांना पेन्शन, नोकऱ्या आणि सुविधांमध्ये प्राधान्य.
– ग्रामीण भागातील बेरोजगारी, सिंचन प्रकल्प आणि शेतमालाला हमीभाव.
प्रहार संघटनेच्या या मोर्चाने भाजप-शिवसेना-एनसीपी महायुती सरकारला पुन्हा एकदा शेतकरी आणि दिव्यांगांच्या मुद्द्यांवर अडचणीत आणले आहे. बच्चू कडू यांनी यापूर्वीच सरकारला “शेतकरीविरोधी” ठरवले असून, हा मोर्चा निवडणुकीपूर्वीच्या राजकीय दबावतंत्राचा भाग मानला जातो. विरोधी पक्षांकडूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवला असून, वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

