भंडारा : शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर केला, परंतु अनेक महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. शासन आदेशाच्या अभावामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. यामुळे जाहीर केलेला बोनस तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने केली आहे.
महायुती सरकारने मागील वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणेनंतर तब्बल एक वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि हमीभावाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. “हा प्रश्न केवळ आर्थिक मदतीचा नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. सरकारने त्वरित बोनस वितरित करावा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष धनंजय लोहबरे यांनी केली.
विलंबाने शेतकऱ्यांचे हाल
शेतीच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना, बोनस आणि हमीभाव वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेवर आणि मुलांच्या शिक्षणावर होत आहे. “घोषणा करणे सोपे आहे. परंतु प्रत्यक्षात आणणे सरकारला जड जात आहे. आता शेतकऱ्यांना आश्वासनांची नाही, तर कृतीची गरज आहे,” अशी खंत लोहबरे यांनी व्यक्त केली.
अन्यथा आंदोलनाचा इशारा
शासनाने शेतकऱ्यांचा आवाज गांभीर्याने घेऊन बोनस वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने दिला आहे.

