>>>खुशाल भुरे | लाखनी प्रतिनिधी
ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यास शासन प्रयत्नशील असून अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेतील काही भ्रष्ट लोकसेवक व अधिकाऱ्यांमुळे उद्देशपूर्ती होत नाही. याचा प्रत्यय मोरगाव/राजेगाव येथे आला. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामात कंत्राटदार व कामावर तांत्रिक मार्गदर्शन देखरेख सनियंत्रण असलेला अभियंता यांच्या संगनमताने साहित्याचा अल्प प्रमाणात वापर केल्यामुळे बांधकाम निकृष्ट प्रतीचे होत आहे.
ग्रामपंचायत मोरगाव अंतर्गत 10 ते 12 वर्षापूर्वी अजय गणवीर ते सुरेश नागदेवें यांचे घरापर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते.पण सिमेंट रोड तयार करण्यासाठी डांबररोड खोदून तेच बोल्डर रोलर दबाई व खडीकरण केले गेले नसल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे तयार होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.जिल्हा परिषद अंतर्गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 7 लाख रुपये अंदाजपत्रकीय रकमेच्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली.
बांधकामाचा करारनामा ग्रामपंचायत मोरगाव चे नावाने असून यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम शाखा अभियंता पंचायत समिती लाखनी यांचेकडे सोपविण्यात आले आहे. करारनामा ग्रामपंचायतीचे नावाने असला तरी टक्केवारीने हे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम साकोली तालुक्यातील एका कंत्राटदारास देण्यात आले आहे. शाखा अभियंताशी कंत्राटदाराने संगनमत करून सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामात अंदाजपत्रकात दर्शविल्या प्रमाणे साहित्याचा वापर केला गेला नसल्यामुळे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम निकृष्ट प्रतीचे होत आहे. या रस्ता बांधकामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून सत्यता जनतेसमोर आणणे आवश्यक झाले आहे.
माहिती व सूचना फलक नाही
कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत विकास कामांची सुरुवात करतांना दर्शनी भागात माहिती व सूचना फलक लावून त्यावर कामाचे नाव, अंदाजपत्रकिय रक्कम, आर्थिक वर्ष, यंत्रणेचे नाव, काम सुरू झाल्याचा दिनांक व काम पूर्ण झाल्याचा दिनांक लिहिणे बंधनकारक असताना सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामावर माहिती व सूचना फलक लावले गेलेच नाही.
मजूरांना सुरक्षा उपकरणे पुरवली नाही
सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामात सिमेंट व गिट्टीचे योग्य मिश्रण व्हावे. या करिता मिक्सर मशीन चा वापर करण्यात येत असल्यामुळे धोकादायक श्रेणीत येते. या बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना जुते, हातमोजे, चष्मा व हेलमेट ही सुरक्षा उपकरणे कंत्राटदाराकडून उपलब्ध करणे आवश्यक असताना मोरगाव येथे तयार करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामावरील मजूरांना सुरक्षा उपकरणे पुरविली गेली नाही.