>>>भंडारा चौफेर | लाखनी प्रतिनिधी
साकोली विधानसभा क्षेत्रातील पोहरा येथे ८३ लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार नाना पटोले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. पोहरा गावासह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पशुपालन करतात. अशा परिस्थितीत, पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी ही या भागातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या इमारतीच्या निर्मितीची तांत्रिक मान्यता २८ जून २०२४ रोजी मिळाली होती. आमदार नाना पटोले यांनी आपल्या विशेष प्रयत्नांमुळे २०२४-२५ या वित्तीय वर्षातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. उपआयुक्त पशुसंवर्धन विभाग, भंडारा यांच्या माध्यमातून या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. या नवीन दवाखान्यामुळे पशुपालकांना आपल्या जनावरांच्या उपचारांसाठी वेळेवर व जवळच्या ठिकाणी सुविधा मिळणार आहे.
पशुपालक शेतकऱ्यांचा आनंद
नवीन इमारतीच्या बांधकामाच्या निर्णयामुळे पोहरा आणि आसपासच्या भागातील शेतकरी आनंदित झाले आहेत. या प्रकल्पामुळे त्यांचे वेळ व खर्च वाचणार असून उपचार सुविधांचा दर्जाही उंचावेल. आमदार नाना पटोले यांच्या या उपक्रमाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. या भूमिपूजन सोहळ्यामुळे साकोली विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण विकासाला नवा आयाम मिळणार आहे.
यावेळी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते शफीभाई लध्दानी, जिल्हा मजूर संघ अध्यक्ष भरत खंडाईत, महिला व बालविकास सभापती स्वाती वाघाये, सभापती प्रणाली सार्वे, लाखनी तालुका अध्यक्ष योगराज झलके, विद्याताई कुंभरे सदस्या जि. प. भंडारा, सदस्या योगीताताई झलके प. स. लाखनी, माजी सदस्य आकाश कोरे तालूका युवक काँग्रेस अध्यक्ष यशवंत खेडीकर, सरपंच रामलाल पाटणकर, विष्णू गिऱ्हेपुंजे, रामूदा अंबादे, डॉ. अन्नू वरारकर डॉ. लता देशमुख तसेच ई. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहूसंख्येने हजर होते.

