>>>>शमीम आकबानी | भंडारा चौफेर
“टिक टिक वाजते डोक्यात,
धडधड वाढते ठोक्यात…,
कभी जमीन, कधी नभी,
संपते अंतर झोक्यात..,
टिक टिक वाजते डोक्यात”
हे दुनियादारी या मराठी चित्रपटातील गाणं. याच गाण्याच्या धर्तीवर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कमळाबाईशी काडीमोड घेत आपल्या मनगटावर घड्याळीचा पट्टा बांधणाऱ्या बुलेट राजा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या एका जिल्हा परिषद सदस्याला आता मुंबापुरीचे डोहाळे लागले आहेत. आता या बुलेट राजांची परिवर्तन यात्रा टिक टिक करत गावागावात फिरू लागल्याने विरोधकांच्या हृदयाची धड धड ठोक्या ठोक्याने वाढत चालली आहे.
हेही वाचा : भावी उमेदवारांनी घेतला ‘लिफाफा सर्व्हे’ चा धसका?
दोनदा जिल्हा परिषद आणि एकदा पंचायत समिती सदस्य झालेले धाकट्या काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष असलेले बुलेट राजा यांना राजकीय क्षेत्रात न ओळखणारा क्वचितच असेल. उत्कृष्ट वक्ता,अभ्यासू, साजेशी उंची एकंदरीत सरसकट सांगायचे झाल्यास एक प्रभावी व्यक्तिमत्व. आपल्या वक्तृत्वाने मतदारांवर भुरळ घालणारे हे प्रलोभनीय व्यक्तिमत्व सध्या हे प्रभावी व्यक्तिमत्व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परिवर्तन यात्रेतून मतदारासमोर जात आहेत.
हेही वाचा : सत्तेच्या पटलावरही ‘नवदुर्गा’ मोठ्या संख्येने प्रस्थापित व्हावी
मतदार हा शब्द जाणीवपूर्वक वापरण्यामागे तसे एक कारणही आहे. एरवी राजकीय प्रतिनिधी जनतेसमोर जात असतात. परंतु निवडणुक आल्यात की त्यांच्या डोक्यात एक दिवसाचा मतदार असतो. या निमित्ताने बुलेट राजा परिवर्तन यात्रेतून विधानसभा क्षेत्रातील प्रश्न मांडत सुटलेत.
एकदा पंचायत समिती सदस्य आणि दोनदा जिल्हा परिषद सदस्य असलेले बुलेट राजा एकदम विधानसभा क्षेत्राकडे वळले. निवडणूक काळात बुलेट राजाकडे विधानसभा क्षेत्राची फार मोठी प्रश्नावली आहे. त्यामुळे नेमके बुलेट राजा कुणाचे परिवर्तन करायला निघाले? मतदारांचे, पक्षाचे की क्षेत्रातील प्रश्नाचे.
निवडणुका तोंडावर आल्यात की सर्वच पक्षाच्या उमेदवार हे फंडे आजमवतात, हे मतदाराला सर्वश्रृत आहे. तो फक्त बोलत नाही एवढेच. पण परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने बुलेट राजा जनतेत अचानक उतरले.
हेही वाचा : सरपंच, उपसरपंचाची दसरा, दिवाळी जोमात : घरकुल लाभार्थी कोमात
या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी अनेक गावात मतदारांच्या भेटी घेत, सभांचा धडाका सुरू केला आहे. यातुन त्यांना कोणते परीवर्तन अपेक्षित आहे हे येणाऱ्या काळात समजेलच. तूर्तास बुलेट राजाच्या परिवर्तन यात्रेतून क्षेत्रात काही परिवर्तन घडेल अशी अपेक्षा राजकिय वर्तुळात चर्चील्या जावू लागली आहे.